मराठी कळफलकाचे प्रमाणीकरण करणे सोपे नाही.  त्यासाठी मराठीतले प्रत्येक अक्षर, जोडाक्षर, काना, मात्रा इत्यादी वापरण्यातल्या वारंवारतेवर सखोल संशोधन व्ह्यायला पाहिजे; तरच कळफलकातल्या कोणत्या कळीवर कोंणते अक्षर किंवा चिन्ह ठेवायचे ते ठरवावे लागेल. परत हा कळफलक फक्त मराठीसाठी चालेल, हिंदी, नेपाळी, संस्कृतला नाही. कारण त्या भाषांतील  अक्षरांच्या उपयोगाची वारंवारता वेगळी असणार. तेव्हा कळफलकाचे प्रमाणीकरण फक्त मराठीसाठी व्हायचे असेल तर ते अयशस्वीच होणार.

आजमितीला आपल्या देशात शंभराहून अधिक देवनागरी कळफलक वापरात आहेत.  थोड्यांची नावे येथे देत आहे : रेमिंग्टन १,२, गोदरेज १,२, अक्षर, प्रकाशक, शब्दरत्न, डीओई, मोड्यूलर, स्क्रिप्ट, इन्स्क्रिप्ट, देवयानी, एल्ई, भारतभाषा, आय्‌टीआर, इंग्लिश फ़ोनेटिक, फोनेटिक ८६, फोनेटिक ८८, गमभन, देवयानी नेटिव्ह लेआउट, देवयानी लिंकिंग लेआउट, एपी‌एस फोनेटिक लेआउट, रोमा, श्रीलिपी, जीआय्‌एस्‌टी/आय्‌एस्‌एफ्‌ओसी, गांगल , रावलॅ, युनिकोड, मनोगत, सीडॅक  इत्यादी इत्यादी.

तेव्हा हा नाद सोडून द्यावा. क्वेर्टी कळफलक कायम ठेवावा आणि आपला टंकलेखनाचा वेग वाढवावा. मला आज ज्या कळफलकाच्या साहाय्याने मराठी टंकायचे आहे, त्याच कळफलकावर  अधूनमधून गुजराथी आणि थोड्या वेळाने फ्रेंच टंकायचे असेल तर कळफलकाचे प्रमाणीकरण मला फार महाग पडेल.