त्या वैज्ञानिकांमधील ज्योतिषांनी चांद्रयानाच्या उड्डाणाची तारीख शुभमुहूर्त आहे असे जाहीर केले आहे.

यावर माझा विश्वास बसत नाही. अशा प्रकारची कोणतीही घटना माझ्या नोकरीच्या कारकीर्दीत मी पाहिल्याचे मला आठवत नाही. कोणत्याही महत्त्वाच्या कामाच्या सुरुवातीला पूजा करून नारळ फोडणे वगैरे केले जाते. हा संस्कारांचा भाग आहे. कोणी उत्साहाने शँपेनच्या बाटल्या उघडतील तसेच. उड्डाणाची तारीख व वेळ ठरवतांना सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची अवकाशातील स्थिती अत्यंत काटेकोरपणे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्याचा बारकाईने अभ्यास केलेला असलाच पाहिजे. यालाच कोणी अलंकारिक अर्थाने शुभमुहूर्त असे म्हंटले असण्याची शक्यता आहे.

तसेच, श्रीहरीकोटा येथून होणाऱ्या प्रत्येक उड्डाणाआधी त्या त्या यानाची प्रतिकृती करण्यात येते आणि उड्डाणाच्या एक दिवस आधी ती तिरुपतीच्या बालाजीचरणी अर्पण केली जाते असेही त्या बातमीत आहे.

हे केले जात असेल तर ते नेमके कोणातर्फे होते याचा तपास घेतल्यास उद्बोधक ठरेल. त्याचा संबंध थेट वैज्ञानिकांबरोबर लावण्याची घाई करू नये असे मला वाटते.