राज नि अनुयायांनी बोलून मिळवलं नि करून घालवलं.
मुद्दा बरोबर असण्याचा आता प्रश्नच उरला नाही.
कुठल्या उन्मादात राज भारतातील राज्यांची तुलना युरोपियन राष्ट्रकांशी करतो, हजारो समर्थक आपल्या सुटकेसाठी राज्यभरात जाळपोळ करत असताना स्वतःचा शिवसेनेत दुखावलेला दुराभिमान अशाप्रकारे सुखावला गेल्यामुळे पोलिसांच्या कड्यातून सूचक हसत हसत वावरतो, नि त्या आधी सरकार - पोलिसांना खडं आव्हान देतो कि हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा!
आपणा भारतीयांना सरकार, पोलिस यंत्रणांचं भय, आदर काही राहिलेलंच नाही. सार्वजनिक मालमत्तेबाबत काळजी तर काडीची नाही.
राज समर्थकांच्या ईमेल्स तुम्हीही वाचल्या असतील - ज्यात ते शहाजोगपणे बरळतात "आता फ़ार झालं, आम्हाला आता महाराष्ट्र हा वेगळा देश मागितला पाहिजे. आमच्या धमन्यांत शिवरायांचं रक्त आहे." इ. इ.
अरे? कशाचा कशाला पत्ता आहे का?
महाराष्ट्राला अराजकाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱा, मराठी तरूणांचा बुद्धिभेद करणारा नि मुख्य म्हणजे भारताच्या अखंडतेवर हल्ला करणारा राज गुन्हेगार आहे.
मी सध्या चीनमध्ये राहतो. हे तीनही गुन्हे करणारा एखादा इसम जर शांघाईमध्ये उभा राहून चिनी सरकारला निर्लज्ज दटावण्या करू लागला की हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा, शांघाई पेटवून देईन! तर त्याला नि त्याच्या तथाकथित 'कार्यकर्त्यां'ना कुठली गती प्राप्त होईल याची कल्पनाही करवत नाही.
मला कल्पना आहे की आजच्या वातावरणात मी वा कुणीही हे लिहिलं तर ते लोकांच्या पचनी पडणार नाही.
पण नाविलाज आहे.