श्री. द्वारकानाथ,
'अमृत' मासिक माझ्या लहानपणी माझ्या घरी यायचे. त्या काळी मध्यम वर्गीय मराठी पालक, मुलांना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या नजरेसमोर एक दर्जेदार मासिक असावे म्हणून 'अमृत'ची वर्गणी भरून ते मागवत असत. त्यातील लेख, विनोद, 'ह्याला जीवन ऐसे नांव' हे सदर, सुभाषितं, मुद्राराक्षसाचा विनोद, उपसंपादकाच्या डुलक्या इत्यादी सदरं मी अत्यंत आवडीने वाचायचो.
आज मला असे वाटते की अमृतचा छपाईचा दर्जा चांगला नव्हता. वर्तमानपत्राचा असणारा कागदच मासिकासाठी वापरला जाई.
आपल्या वरील विधानाशी मी सहमत नाही. हल्ली (गेल्या २५ वर्षात) 'अमृत' माझ्या पाहण्यात आलेले नाही. पण, 'त्या' काळी 'अमृत'च्या कागदाचा दर्जा उत्तम होता. 'अमृत' मध्ये वर्तमानपत्राचा कागद माझ्यातरी पाहण्यात कधी आला नाही.
'अमृत' बरोबरच, 'चांदोबा' 'कुमार' 'विज्ञानयुग' 'विचित्र विश्व' 'इंद्रजाल कॉमिक्स' ही मासिकं माझ्या वाचण्यात होती. ('आवाज' 'जत्रा' मधील चित्र मोठ्यांची नजर चुकवून पाहायची.) रेडीओ व्यतिरिक्त कुठलीही करमणूक नव्हती. त्यामुळे वाचन जास्त होत असे. पुढे TV आल्या पासून पुस्तके विकत घेऊन, वर्गणी भरून वाचणे हळू हळू मागे पडत गेले. वाचकवर्ग आटत गेला. त्यामुळे प्रकाशकांनाही पुस्तके छापणे परवडेनासे झाले.
पण 'त्या' सर्व दर्जेदार मासिकांनी केलेले वाचन संस्कार आजही सुख देतात.
धन्यवाद.