मला अस वाटत की अशा वेळी मानसिक आधारासाठी देवासारख्या संकल्पनेचा आधार घेतला तर काही वाईट नाही.

प्रश्न असा आहे की अशा गोष्टी किती मर्यादेपर्यंत असाव्यात. कारण, उपासतापास करणे, एखाद्या गोष्टीसाठी नवस बोलून ते इच्छित प्राप्त झाल्यावर तो फेडण्यासाठी काहीही करणे, उमेदीच्या वयातील आयुष्याचा बराचसा वेळ पूजाअर्चा, कर्मकांडे आणि विविध तऱ्हेच्या नामजपाच्या वह्या लिहिण्यात घालवणे इथपासून ते बालबळी, नरबळीपर्यंतच्या गोष्टी ह्यादेखील मानसिक आधारासाठीच असतात. किमान ह्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींचा तसा दावा तरी असतो.

श्रद्धा म्हणजे तरी नक्की काय? आपली संस्कृती/धर्म सहिष्णू आहे, इतर श्रद्धांचा आदर करणारी आहे असे आपण म्हणतो. पण आता प्रश्न उद्भवतो तो म्हणजे कोणत्या श्रद्धेचा आदर करावा. माझ्या घरची मंडळी उपासतापास करतात कारण त्यांची अशी श्रद्धा आहे की त्यामुळे आपण देवाच्या अधिक जवळ जातो, तर मी शुद्ध शरीरशास्त्राच्या आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने बघणारा माणूस उपासाच्या पूर्ण विरोधात असतो. जोवर उपास करणारे उपास न करणाऱ्याला उपास करायला भाग पाडत नाहीत तोवर त्यांची श्रद्धा ठीक आहे. पण जेव्हा उपास करणाऱ्यांना मधुमेहादी आजार जडलेले असतात तेव्हा त्यांच्या श्रद्धेचा आदर करणे कितपत योग्य आहे? स्वीकारार्ह श्रद्धा कोणती आणि त्या श्रद्धाळूला अथवा त्याच्या आप्तस्वकीयांना अथवा पूर्ण समाजाला घातक ठरणारी श्रद्धा कोणती हे ठरवणे खूप अवघड आहे. माझ्या एका मित्राच्या वडिलांना मधुमेह होऊनही उपासाच्या दिवशी रताळे, बटाटा, साबुदाणा आणि तत्सम साखर पटकन वाढवणारे पिष्टमय पदार्थ खाणे अयोग्य वाटत नाही.
जर पूजाअर्चा करणे आणि देवाला नैवेद्य दाखवणे ही कर्मकांडे आपण त्या-त्या व्यक्तींच्या श्रद्धेचा भाग म्हणून स्वीकारली आहेत तर नरबळी देणाऱ्यांच्या श्रद्धेचा स्वीकार का करू नये? कदाचित ही दोन उदाहरणे अत्यंत टोकाची असतील. पण श्रद्धेची अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यांमुळे समाजावर तात्काळ नाही पण दूरगामी परिणाम नक्कीच होत असतात. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा प्रसंगी होणारे ध्वनिप्रदूषण हा समाजाच्या श्रद्धेचा भाग म्हणून आपण स्वीकारतोच. पण त्यामुळे कोणाला त्रास होत नसतो असे नाही. मोठ्या एकादश्यांचा दिवशी विठोबाला घातले जाणारे दुग्धस्नान, दधिस्नान आपण सामाजिक श्रद्धेचा भाग म्हणून स्वीकारतो. पण एरव्ही कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सूर धरून गळे काढणारे त्यावेळी होणारी अन्नाची नासाडी पाहून गप्पच बसतात. का? केवळ ती श्रद्धा आहे म्हणून? माझ्या मते हा दुटप्पीपणा आहे.
पूर्वी अत्यंत श्रद्धेने पाळली जाणारी सतीची चाल बंद करून टाकली गेली. आपण सतीच्या चालीचा श्रद्धा म्हणून आदर का नाही करत? कारण ती निर्विवादपणे भीषण होती, बीभत्स होती.
मुहूर्त नाही म्हणून, मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून लग्न वर्षवर्ष पुढे ढकलणे ही कसली आली आहे श्रद्धा?

ही सगळी उदाहरणे, आपण म्हणाल, निश्चितच अवैज्ञानिक विचारांची आहेत. ह्या घटना म्हणजे अंधश्रद्धाच. पण मग परत तोच प्रश्न भेडसावतो की श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती? ती सीमारेषा ओळखायची कशी?

माझ्या मते अशा परिस्थितीत तर्कनिष्ठ विचार करणे जास्त योग्य ठरते. पण असा विचार करीत असता श्रद्धेच्या सर्वमान्य व्याख्येत बसणाऱ्या अनेक गोष्टी मनाला पटेनाशा होतात. देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही म्हणून ते अमान्य करू नये असे म्हणणाऱ्या लोकांना ते मान्य तरी का करावे असा प्रश्न करावासा वाटतो. आपल्याला सर्वच गोष्टी माहीत आहेत असा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणाऱ्यांचा दावा नसतो. पण ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यांचा भार देवावर आणि दैवावर सोपवायची त्यांची तयारी नसते. विज्ञानाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे नाही पण विज्ञान हेच सर्वात जास्त स्वीकारार्ह तत्त्वज्ञान आहे हे नक्की. ज्या गोष्टींची कारणे आज विज्ञानाकडे नाहीत ती शोधायची महत्त्वाकांक्षा आहे.

माणसे पराकोटीची सश्रद्ध किंवा अगदी नास्तिक उगीच होत नाही. त्यामागे काही प्रबळ कारणे असतात हे खरेच. पण ही कारणे स्वीकारणीय असतात का? माझ्या माहितीतील एकाची आई आजारी असताना तो देवाला अनेक नवस बोलला होता. पण अखेरीस 'जातस्य हि ध्रुवो मृत्युः' ह्या उक्तीचाच जय झाला आणि तेव्हापासून त्याचा देवावरचा विश्वास उडाला. (पण अजूनही दैव, ज्योतिष, भविष्य, मंत्रतंत्र अशा गोष्टींवर त्याचा विश्वास आहे.) असे नास्तिक होणे किती योग्य?

दंगलीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यावर 'आम्ही भरलेल्या टॅक्सच्या पैशाची नासाडी झाली' असे म्हणणाऱ्यांच्या हे कसे लक्षात येत नाही की देवाला दह्यादुधाने न्हाऊ घालतात ते तुमच्याच देणगीतून. चांद्रयानाची प्रतिकृती बालाजीला अर्पण केली जाते ती नागरिकांच्याच पैशातून.

अनेकदा अशी उदाहरणे दिली जातात की अत्यंत उच्चशिक्षित एंजिनिअर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, साहित्यिक वगैरे मंडळी रूढ अर्थाने सश्रद्ध आहेत. इतकी हुशार मंडळी जर श्रद्धावान असतील तर श्रद्धा बाळगणे चूक कसे असे विचारले जाते. पण माझ्या मते तरी कमी शिक्षित असली तरी तर्कनिष्ठ विचार करणारी व्यक्ती ही उच्चशिक्षित पण प्रचलित अर्थाने श्रद्धावान व्यक्तींपेक्षा बरीच चांगली. कारण ह्या उच्चशिक्षित व्यक्तींची तर्कनिष्ठ विचार करण्याची कुवत असते पण तयारी नसते. अशा लोकांना कधीही बदलता येत नाही. उलटपक्षी, जरी कमी शिकलेली असली तरी तर्कनिष्ठ व्यक्तीची तसा विचार करण्याची तयारी तरी असते.

वर्तमानपत्रात काय आले आहे ते मीदेखील वाचले नाही, म्हणूनच त्यात किती तथ्य ते पण माहिती नाही... कदाचित काही वैज्ञानिकांचा या मुहूर्त बघण्याला, प्रतिमा अर्पण करण्याला विरोधही असेल. (चक्रधर१ ह्यांनी चिकटवलेली बातमी माझ्या कार्यालयातून दिसत नाही. ) पण खरोखरीच थोड्या जरी वैज्ञानिकांनी विरोध केला असेल तर अजूनही आपण निराश होऊ नये, धुगधुगी अजूनही आहे ह्यात आनंद मानावा. कारण बहुतांशी वैज्ञानिक तर्कनिष्ठ विचार करणारे असतीलही पण विरोध करण्याचे धार्ष्ट्य दाखवणे हीदेखील एक चांगली कौतुकास्पद बाब आहे.