नमस्कार.
तुमचं म्हणणं बरोबर आहे. अहमहमिकेने केलेल्या चर्चेतून साधारणतः मतपरिवर्तन होत नाही नि मनपरिवर्तन दूरची गोष्ट.
त्यामुळे तुम्ही मांडलेले मुद्दे नि मारटकरांचे प्रश्न यांना मुद्देसूद उत्तरं देत बसण्याचा उद्योग मी इथे करणार नाही.
तसेही तुम्ही मांडलेले नि मराठी अस्तित्वाच्या अनुषंगाने सध्या चर्चेत येणारे जवळपास सगळेच मुद्दे सत्याधारित आहेत. त्यामुळे त्यांना काटशह देण्याची गरज नाही. पार्ल्याच्या भाजीबाजारात मराठी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तोंडावर कुत्सित भाव आणून हिंदीतून उत्तर देणारा भाजीवाला पाहून माझ्याही अंगाचा तीळपापड होतोच. पण भाजीच्या पाट्या घेऊन बसलेल्या मराठी मावश्या-मामे वा दादा-ताई दिसत नाहीत म्हणून वाईटही वाटतं. आमच्यासारख्या लाडावलेल्या एन आर आय लोकांचा रिक्शा टॅक्सीवाल्यांनी सांगितलेल्या ठिकाणी यायला नकार दिला की वाईट जळफळाट होतो. त्यात ते भय्ये असले की आणखीनच. पण भर पावसात, रात्री सोबतीला लहान लहान मुलं असलेल्या महिलांना भाडं नाकारून रिक्षातून उतरवणारे मराठी रिक्षावालेही मी पाहिले आहेत. अशा प्रसंगी मधे पडून रिक्षावाल्याला हिसका दाखवण्याचे उद्योगही मी केले आहेत.
राजने मांडलेले मुद्दे खरे असतील, पण त्यांचं प्रकटीकरण योग्य तऱ्हेने केलेलं नाही. मुद्दे खरे असतील, पण ते धसाला लावण्यासाठी आवश्यक कृती करण्याबाबतचं त्याचं चिंतन एकतर घातक तरी आहे वा अपरिपक्व तरी. दोन्हीपैकी काहीही असल्यास मराठीजनांनी त्याच्या मागोमाग जाण्यात धोका आहे. नेता हा व्युत्पन्नमती असला पाहिजे. मराठी अस्मितेचा अतिरेक करण्यासाठी पदोपदी दक्षिणेच्या राज्यांची उदाहरणं दिली जातायत, मला सांगा रामस्वामी नायकर वा भिंद्रनवालेचा मराठी अवतार आपल्याला उभा करायचा आहे का? वेगळा महाराष्ट्र करण्याची मागणी संघटनेच्या व्यासपीठावरून करण्याइतका राज वेडा नाही. तशी वेगळ्या तामिळभूमीसाठी द्र. मु. क. नेही मागणी केली असल्याचं मला माहित नाही. पण प्रांतवादाचा भस्मासुर डोक्यावर बसवून देशांतर्गत उचापती करणाऱ्या कुणाचीही नियत ही बिनशर्त राष्ट्रशरण नसते हे उघड दिसतं आहे. राजच्या कृतींमधून तो वास येऊ लागला आहे म्हणून मी माझ्या वरच्या प्रतिक्रीयेत म्हटलं की मुद्दा बरोबर आहे की चूक ही बाब आता गैरलागू आहे.
जाता जाता -
... कुठूनतरी एक फार्वर्डेड मराठी इमेल आली. वाचता वाचता मला एकदम घृणा नि संताप दोन्ही आले. मराठी माणसाला देशात नि खुद्द महाराष्ट्रात डावललं जातं आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळी माहिती नि आकडेवारी त्या इमेलला जोडलेल्या फायलीत दिलेली होती. या सादरीकरणात वेगळा महाराष्ट्र देश करण्याची धमकी होती तीही दोनवेळा. अत्यंत दुर्दैवी विचार आहेत. ही विषवल्ली नेमकी कुठे मूळ धरते आहे हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी कुणी 'वेगळा महाराष्ट्र' करण्याची भाषा केली आहे त्यांना तोफेच्या तोंडी दिलं पाहिजे. इमेल सोबतच्या त्या फायलीत दिलेली आकडेवारी खरी अवश्य असेल पण योग्य नाही. 'खरी' आणि 'योग्य' यांतला फरक तुम्हां आम्हाला सुशिक्षितांना समजावा. मी स्वतः किती मराठी अभिमानी आहे ते मला स्वतःला माहित आहे. माझ्या महाराष्ट्र नि मराठीप्रेमासाठी मला राज ठाकरे सारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण हा जो काही प्रचार केला जातो आहे तो निव्वळ गाढवपणा आहे. हे प्रकरण वाढू दिलं तर त्याचा राक्षस बनेल नि त्याचा मराठी माणसाला जास्त तोटाच होईल.
मराठी मावळ्यांकडून अशा पद्धतीची खंडोजी खोपडेगिरी अभिप्रेत नाही.
अनंत काळाचा साक्षीदार भगव्या झेंड्याचा,
मराठी मनांची मशागत करणाऱ्या संतसज्जनांचा,
भोळ्या भाबड्या मावळ्यांना शक्तिसंपन्न करून राजकीय नि राष्ट्रीय दृष्टी देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचा,
’अहद तंजावर - तहद पेशावर’ हिंदवी स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शिवाजी महाराजांचा,
भीमथडी तट्टं अटकेपार नाचवणाऱ्या नि इस्लामी वावटळीला पानपतावर रोखून धरून स्वतःचं बलिदान देणाऱ्या मराठी सल्तनतीचा,
आपल्या अलौकिक नेतृत्वाने उभ्या भारताला भारून टाकणाऱ्या लोकमान्य टिळकांचा,
सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारता मारता मरेतो झुंजणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा,
माणूस घडवण्याचं पवित्र कार्य देशाच्या गावागावात पोहोचवणाऱ्या डॉ. हेडगेवारांचा,
भारतवर्षाला आंतरभारतीची संजीवनी देणाऱ्या साने गुरुजींचा,
देशहितासाठी पडलेल्या असंख्य असंख्य मराठी बलिदानांचा,
नि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने अर्थपूर्ण झालेल्या मराठी मातीचा धडधडीत अपमान करायचा असेल तर असले विचार प्रसृत करावेत.
मराठी जनता त्यांचा धि:कारच करेल.
॥ जय हिंद । जय महाराष्ट्र ॥