हाहाहाहा.... प्रीती, खूपच मजा आली तुमचे अनुभवकथन वाचून. तुमची लिहिण्याची पद्धत तर खूपच खास. मस्तच !

लहानपणी चप्पल हरवणे आणि मोठेपणी हरवणे यात किती फरक असतो हे प्रकर्षाने लक्षात आले. माझी चप्पल ( एकच ) हरवली होती खेळाच्या मैदानात तर मला टेन्शन अनवाणी पायाने इकडेतिकडे कसे फिरायचे किंवा घरी कसे जायचे याचे नव्हते तर ते आईला कळणार नाही यासाठी काय करावे लागेल याबद्दल होते ! मी अगदी शहाजोगपणे दुसरी चप्पल चपलांच्या स्टँडमध्ये नेऊन ठेवली होती आणि काही झालेच नाही असे जतवत वेळ घालवला होता. दुसऱ्या दिवशी शाळेला जायची वेळ झाली आणि मी 'माझी एक चप्पल कोणीतरी चोरली' असा कांगावा सुरू केला ! 'हरवली' असे जाणूनबुजून म्हणाले नाही पण आईच्या 'कोणी एकच चप्पल कशी चोरेल?' या प्रश्नाला सुयोग्य उत्तर सापडले नाही आणि रडून ( याने इमोशनल सपोर्ट लवकर मिळायला मदत होते असे म्हणतात ! ) सत्य काय ते कबूल केले. पाठीत रपाटे पडले आणि 'कार्टे, कालच संध्याकाळी सांगितले असतेस तर एव्हाना नवीन चपला पायात असत्या तुझ्या आणि शाळेला उशीर झाला नसता तुला.'असे म्हणून पटापट साडी बदलून आई मला कडेवर उचलून रिक्षाने शाळेत सोडून आली. मी अनवाणी आहे याचा कोणाला फरक पडत नव्हता पण जेव्हा माझ्या नव्या चपला मागाहून आल्या त्यावेळी मात्र माझा कारनामा वर्गभर आणि मग शाळाभर झाला होता...  आजही शाळेतले दोस्त भेटले की त्या हरवलेल्या चपलेवरून माझी भयंकर चेष्टा करतात.