मराठी अस्मिता जाळपोळीने जागी होणार असेल तर होऊ दे बापडी! पण मागाहून आग विझवायची कुणी?
दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे पडेल ते काम आणि मिळेल तो पैसा अश्या पद्धतीने जगणे, कशातही कमीपणा न मानणे, आणि जरासुद्धा माज न करणे, वरिष्ठांचे आणि बलिष्ठांचे लांगूलचालन करणे हे किती मराठी माणसांना जमणारेय? बिहारींना हे जमतं म्हणून त्यांचं कुठेही जमतं आणि फावतं!
आणि सगळ्यांत महत्त्वाचं..... केवळ उत्तरभारतीयांवर यांचा राग का? मुंबईतील सायन माटुंगा ही दाक्षिणात्यांची तर मुंबईचा बहुतांश भाग ही गुजराथ्यांची जहागीर असल्यासारखी झाली आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मारवाडी लोक प्रचंड प्रमाणात आहेत. पुण्यासारख्या शुद्ध मराठी शहरातही आय. टी. मुळे भारतभरातील जनता मोठ्या प्रमाणात आली आहे.
एकट्या मुंबईचंच बोलायचं झालं तर उत्तर भारतीयांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दक्षिणी आणि गुजराथी लोक आहेत! . पण त्यांच्याविरोधात हे आंदोलन उभं नाही! गुजराथ्यांच्या बाबतीत याची कारणं सोपी आहेत --
१) गुजराथ्यांना मुंबईतून हाकललं तर मुंबईची आणि पर्यायाने महाराष्ट्राचीच नव्हे तर अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागेल! (राजला पैसा खाता आणि मिळवता कसा येणार?)
२) राज कितीही टिवटिव करत असला तरी वेळ आल्यास नरेंद्र मोदी त्याला नक्कीच भारी पडणार! त्यामुळे तो त्यांना भीत असावा!
मराठी माणसांना कशाच्या किंवा कुणाच्या तरी विरोधात रस्त्यावर उतरवण्यापेक्षा मराठी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न हा करत नाही? त्याची संघटनशक्ती अफाट आहे. त्याच्याकडे तरूण वय आहे, रुबाबदार व्यक्तित्वाचा करिश्मा आहे, मग हे सगळं लोकांसाठी वापरायचा नुसता आभास का तो निर्माण करतोय? प्रश्न सोडवायचा प्रयत्न का नाही करत? आंदोलनाचा परिणाम चांगला हवा असेल तर ते आंदोलन योग्य दिशेने जायला हवे. मी मवाळ गांधीवादी नक्कीच नाही. पण एक मात्र मला खात्रीने ठाऊक आहे. रक्त उसळलं पाहिजे ते असं की ते आपल्याला चालना देईल. इतकंही नाही की आपल्यालाच त्या रक्ताची उलटी होऊन आपणच संपून जाऊ. वाईट हे की ते आत्मबलिदानही नसेल! त्यानं धसका बसून आंदोलनालाच खीळ बसायची.
अस्तित्वात असलेल्या यंत्रणेच्या चाकोरीत हे प्रश्न सुटायचे नाहीत हे उघड आहे. त्यामुळे आंदोलन हवंच! पण व्यवस्थेला धक्का देण्याचा हा मार्ग सुद्धा आता जुना झाला. त्यालाही फाटा देऊन काही विचार करण्याची गरज आहे...