मंगला गोडबोल्यांच्या 'माझे स्टेईंग गेस्ट्स ' मधला उतारा आहे का हा? बहुधा सहवास नावाच्या पुस्तकात आहे हा लेख. 'स्टेईंग गेस्ट्स' आणि 'अजुनी बसून आहे' हे लेख त्यांच्या नावांमुळे लक्षात राहिले होते.
मंगलाताईंचीच एक आडवी रेघ नावाची कथा आहे. पुस्तकाचं नाव आठवत नाही पण स्कूटर मेकॅनिक पासून ते प्लंबरपर्यंत घरातली सगळी कामं एकहाती लीलया पेलणारी एक गृहिणी, केवळ गृहिणी आहे म्हणून, आपल्या मुलाच्या शाळेचा फॉर्म भरताना व्यवसाय या सदरात फक्त आडवी रेघ काढते असा तिचा आशय आहे. वाचताना अंगावर काटा आला होता. पुलंच्या चरित्रात्मक ग्रंथांच्या संपादनाचं वगरे काम त्यांनी केलेलं आहे आणि झुळूक वगरे हलक्याफुलक्या ललितलेखांची त्यांची पुस्तकं प्रसिद्धच आहेत. गुंडाबळी ही अलिकडेच वाचलेली त्यांची धमाल कथा खूप आवडली होती. नर्मविनोदी लेखनाबरोबरच गंभीर लेखनही त्या किती समर्थपणे हाताळतात याची प्रचिती '.... आणि मी' या पुस्तकावरून येते. एकूणच या पुस्तकाची संकल्पनाच फार सुरेख आहे.
माझं उत्तर कदाचित चुकलंही असेल पण त्या निमित्ताने 'पुलंच्या' पार्ल्यामध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या या गुणी लेखिकेची निखळ आनंद देणारी पुस्तकं आठवायला मिळाली हेही नसे थोडके!

--अदिती