दांडेकरांचे पत्र वाचले. असे वाटले की ह्याला हसण्यावारी न्यावे. एकतर त्यांच्या म्हणण्यास काही पुरावा त्यांनी दिलेला नाही. जो काही मोघम उल्लेख केला आहे त्यावरून निष्कर्ष काढणे दूरच राहो, साधा वस्तुनिष्ठ तर्कही करणे शक्य नाही. समजा त्यांनी सांगितलेले पत्र अस्तित्वात असलेच आणि प्रकाशात आले तरी नुसता पुरावा असून चालत नाही त्याचे प्रमाणीकरण आणि त्याची अर्थनिश्चिती योग्य पद्धतीने झालेली असेल तरच त्यावर विश्वास ठेवता येईल.

जर कुणाकडे एखाद्या बाबतीत विश्वासार्ह पुरावा असेल आणि तो प्रमाणभूत आणि अर्थपूर्ण असेल तर तो विषय वृत्तपत्राच्या वाचकपत्रांमध्ये मांडला जाईल असे मला वाटत नाही. त्याची व्यवस्थित मांडणी करून बातमी / लेख स्वरूपात तो सादर केला जाण्याची शक्यता अधिक आहे. श्री. विजय दांडेकर यांस आपल्या या संशोधनाबाबत/माहितीबाबत पुरेसा आत्मविश्वास नसावा आणि म्हणूनच त्यांनी वाचकपत्रांचा आधार घेतला असावा असे मला तरी वाटते. तूर्तास आपण मार्सेलिसची उडी सत्य आहे असे मानण्यास प्रत्यवाय दिसत नाही.

अर्थात, सावरकरांविषयीचा आदर या मुद्द्यावर आधारित नाहीच! मात्र सावरकरांची ती उडी हे पारतंत्र्याची बंधने झुगारून देऊन स्वतंत्र होण्याच्या दुर्दम्य वृत्तीचे प्रतीकच आहे. आणि प्रेरणास्थान आहे. ते खरे नसले तरी चालेल. सावरकरांनी आत्मचरित्रात मार्सेलिसच्या बंदरावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असे म्हटलेच आहे की. अगदी शौचकूपाच्या खिडकीतून समुद्रात नसेलही मारली समजा उडी तरी पहारेकऱ्यांना चकवून पळून तरी ते गेलेच ना! महत्त्व समुद्रात उडी मारण्याला नाही, तर त्यांच्या स्वतंत्र बाण्याला आहे. बंडखोरीला, सरफरोशीला आहे.

सावरकरांनी शौचकूपाच्या खिडकीतून समुद्रात उडी मारली ही महापुरुषांच्या भोवती रचल्या जाणाऱ्या माहात्म्यकथांपैकी एक आहे असे समजा आपण गृहीत धरले, तरी या माहात्म्यकथा मोठ्या समाजोपकारक असतात हेही तितकेच खरे....!