योग्य अयोग्य ही दूरची गोष्ट. खरंतर ज्यात असा भेद करता येत नाही अशाच अनेक पद्धती असतात उदा.

खाण्याचे चमचे भांडेवाल्या बाईस घासायला टाकावेत की स्वतः घासावेत?

भाजीला मिरची वापरावी का लाल तिखट?

फोडणीत तिखट मसाला घालावा का भाजी शिजल्यावर?

भेंडीच्या भाजीला गूळ घालावा का नाही?

केर काढण्याची सुरुवात स्वयंपाकघरातून करावी का बैठकीच्या खोलीतून?

भात फिजमध्ये ठेवावा की नाही?

चहा करताना दूध पाणी आधी एकत्र करावे की कोरा चहा करून नंतर दूध वेगळे तापवून ओतावे?

घासून झालेली भांडी वाळवून जागी लावावीत की ओली असताना पुसून घेऊन?

या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांना कोणतेही एकच योग्य उत्तर असणे अशक्य आहे. आपापल्या घरातील सवयीप्रमाणे पद्धतीप्रमाणे प्रत्येकाचे वेगळे उत्तर असणार.

अशा सवयींमध्ये जर सासरी-माहेरी फरक असला तर "हिचंही ठीक आहे" असं नवऱ्याला सुद्धा वाटणं कठीण आहे. आणि बरेचदा अशा छोट्या गोष्टींतूनच मोठे गैरसमज आणि भांडणं होतात.

म्हणजे सासू वाईट नसते, पण "आपल्या घरातल्या पद्धती या अशा" हे सुनेला ठसवायचं असतं असं परंपरेने तिच्या मनावर बिंबवलेलं असतं. ते सांभाळण्याच्या भरात सुनेला सुद्धा सवयी आहेत हे ती विसरून जाते आणि मग छोट्या छोट्या गोष्टींत समंजसपणा दाखवायचा राहून जातो. त्याचा परिणाम सुनेच्या बंडखोरीत किंवा बिचारेपणात होतो...

दुसऱ्या बाजूने विचार केला तर थोडं वेगळं वाटतं. साधं व्यावहारिक उदाहरण पाहिलं तर काय होतं? आपण ट्रेनमध्ये शिरताना "आतले दार अडवतात मेले" म्हणून त्रागा करतो. आणि आत गेल्यावर पुढच्या स्टेशनवर आपणच दार अडवतो. आपली मानसिकता बदलते. तसंच काहिसं इथेही होतं. नवीन सून जेव्हा घरी येते तेव्हा घरातली जागा, कपाटं, खोल्या, वस्तू यांत लग्नाअअधीच योग्य तो बदल करून घेऊन नेहमीचं रूटीन बदललेलं असतं सासरच्यांनी. त्यामुळे आता तडजोडीची त्यांची तयारी कमी असते. म्हणून ते दार अडवतात. हे असंच झालं पाहिजे! ते तसं काय तुझं? वगैरे म्हणतात... तीच सून सासू होऊन स्वतःच्या सुनेशी तशीच वागते असं चक्रं चालूच राहतं.

नवेपणाचं रूपांतर आपलेपणात व्हायला जो वेळ लागतो तो नव्या माणसाला adjust करायला लागणं ही जनरीत आहे. एकदा का आपलेपणा विश्वास निर्माण झाला की माझंही/माझंच योग्य असं पटवायला सोपं जातं.

ह्या जनरीतिचा स्त्री म्हणून विचार न करता माणूस म्हणून विचार केला तर समाजातल्या कोणत्याही व्यवहाराच्या मुळाशी हे तत्त्व दिसेल. आमच्या ऑफिसात असं करतात, या संस्थेची हीच परंपरा आहे, अशी वाक्यं आपण ऐकतोच की! किंवा इथे बिनधास्त रस्त्यात कचरा टाकत असलो तरी हाँगकाँगला जाऊन टाकतो का? जिथे जातो तिथल्यासारखंच वागतो किनई? तसंच हेही आहे.

मुलगी सासरी जाते हे चित्र जोवर कायम आहे तोवर ती घरात नवी असणार आहे. आणि त्यामुळे तिला अधिक तडजोड करावी लागणार आहे. म्हणजे तिने ती केलीच पाहिजे असे बंधन तिच्यावर असू नये कधीच. ते असेल तर झुगारून देताही आले पाहिजे. आणि सासरच्यांनीही समंजसपणा दाखवलाच पाहिजे पण आपलेपणा निर्माण व्हायला हवा असेल आणि तो झाल्यावर ह्या फालतू गोष्टी आपोआपच गळून पडायला हव्या असतील तर सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे! सुनांच्या नवऱ्यांनी सगळ्यात जास्त! :-)