चेतन, इतका छान प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खरंच भारतातला सगळ्यात मोठा सण आणि त्याचा काहीच थांगपत्ता नाही! वसुबारसेची आख्यायिका मलाही माहित नाही पण शोधता येऊ शकते. शोधल्यावर कळवेनच.
परंतु आत्ता वसुबारस आणि गोवत्सद्वादशी या दोन शब्दांवर विचार सुचला तो मांडते. हे दोन्ही शब्द एका अर्थाचे नाहीत. वसु ह्या शब्दाला २ अर्थ आहेत- समृद्धी, संपत्ती (पृथ्वीला वसुमती वसुंधरा ही नावे समृद्ध या अर्थाने दिलेली आहेत.) आणि देवांचा एक प्रकार (अष्ट)वसु. दिवाळी ज्या काळात येते तो काळ सुगीचा असतो. त्यामुळे विविध प्रतीकांनी समृद्धीची लक्ष्मीची पूजा केली जाणे हा मुख्य धागा या सर्व दिवसांत आपल्याला दिसतो. वसुबारसेला गोधनाची (यावरून गोवत्सद्वादशी हा शब्द आला असावा असं वाटतं), धनतेरसेला धान्याची, आमावस्येला दागदागिन्यांची सोन्यानाण्याची, पाडव्याला नव्या वस्तूंची, भाऊबीजेला स्त्रीधनाची (माहेरून भावाकडून येणाऱ्या ओवाळणीची) अशी पूजा होताना दिसते.
आत्ता फार काही सांगू शकत नाही मात्र मी नक्की शोधण्याचा प्रयत्न करीन.