प्रत्येक भाषेचा एक स्वतंत्र असा उच्चारसंच असतो. ती मातृभाषा असणाऱ्या लोकांना त्या उच्चारसंचात उत्तम बोलता येते. (दोष/ सरावाचा अभाव असे अपवाद वगळता) मात्र त्याबाहेरील उच्चार हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागतात. म्हणून परभाषा शिकताना कोणालाही कष्ट हे घ्यावेच लागतात. तरीही मातृभाषेचे संस्कार पूर्ण नाहीसे कधीच होत नाहीत. त्यामुळेच परभाषा चांगली बोलता येणाऱ्याचीही मातृभाषा वेगळी आहे असे नक्की जाणवते.
मात्र तरीही परभाषा शिकताना मराठी माणसाला तुलनेने कमी त्रास होतो असे दिसते. देशा-परदेशातील अनेक विद्यार्थ्यांना मराठी संस्कृत आणि जर्मन शिकवताना मला असा अनुभव आला आहे.
याचे भाषाशास्त्रीय कारण असे आहे की मराठीत संस्कृतप्रमाणेच प्रत्येक उच्चार हा जीभ एका विशिष्ट ठिकाणी टेकवून स्थिर करून केला जातो. हिंदीदेखील अशा प्रकारे बोलली जाते पण त्यावरील ऊर्दूच्या प्रभावाने उच्चारसंचात थोडा फरक पडला आहे. इतर भारतीय किंवा विशेषतः युरोपीय भाषा या उच्चारसमयी जीभ स्थिर न करता ती तोंडात घोळवून बोलल्या जातात. परभाषा शिकताना जिभेच्या हालचालींत जो बदल (स्थिर-अस्थिर) होणे अपेक्षित असते तो सहज जमत नाही म्हणून परभाषा शिकणे अवघड असते.
अस्थिर जिभेने बोलणाऱ्या लोकांना जीभ स्थिर ठेवून बोलणे खूप जड जाते. त्या मानाने स्थिर जिभेने बोलणारे लोक जीभ अस्थिर करून अधिक सहजपणे बोलू शकतात. याचे एक अगदी साधे उदाहरण देता येईल. स्पष्ट बोलणाऱ्याला बोबडे बोलता येते कारण योग्य तेथे योग्य वजन देऊन जीभ स्थिर करता येणाऱ्याला जाणीवपूर्वक ती जड करून घोळवणे शक्य असते. पण बोबडे बोलणाऱ्याला मात्र दीर्घकाळ उपचार करून घेऊन अधिक प्रयत्नांनी जीभ स्थिर करणे शिकून सुधारावे लागते.
तसेच भाषाभ्यासाचेही आहे. मराठीत स्थिर जिभेने स्पष्ट बोलू शकणारे लोक परभाषा जास्त सहज शिकतात.
(काही अनाकलनीय तांत्रिक अडचणींमुळे सुपूर्त न होऊ शकलेला हा प्रतिसाद लेखिकेने व्य. नि. प्रशासनास कळवलेला आहे : प्रशासक)