ऋचाच्या मतांशी सहमत.   दुसरं असं की मुंबईची जनता भोळी आहे म्हणून तिच्यावर हे प्रयोग केले जातात असं समजणं गैर आहे.   विक्री व्यवस्थापनाच्या दृष्टिनं एखादं उत्पादन जास्तीत जास्त खपावं असं वाटेत असेल तर कुठचीही कंपनी त्याची प्रायोगिक विक्री (टेस्ट मार्केटींग) सर्वात अवघड बाजारात आधी करून ते उत्पादन दुसऱ्या कुठच्याही बाजारपेठेत नक्की खपेल याची खात्री करून घेतेच.   त्यादृष्टिनं मुंबईला या कंपन्या अवघड चोखंदळ बाजारपेठ समजतात हे मुंबईसाठी अभिमानास्पदच आहे.  

आपल्या राहत्या भागात एखादे नवीन हॉटेल सुरू झाल्यास आपण स्वतः च त्याला भेट देण्या उत्सुक असतो पण भारतात अन्यत्र इतका स्वागतशील समाज नसतो.

हॉटेलचंच म्हणाल तर मला वाटतं हॉटेल्स पुण्यात जेवढी चालतात तेवढी कदाचित भारतातल्या दुसऱ्या कुठच्याही शहरात चालत नसतील.  पिझ्झा हट, कॅफे कॉफी डे, मॅक डोनाल्डस ही सारी हॉटेल्स मुंबईत चालू होण्या आधी पुण्यात चालू झालीत.  आणि पिझ्झा हट आणि मॅक डोनाल्डस या दोन्ही हॉटेल्सच्या बाहेर सुरुवातीच्या काळात पुण्यात रांगा लागायच्या.  आता या समाजाला तुम्ही स्वागतशील नाही असं म्हणाल का? 

मुंबईकर जनतेने असे घाऊक पणे बळी जाणं थांबवलं पाहिजे.

हे म्हणणं म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे.  आपली बाजारपेठ एवढी मोठी आहे,  ऋचानं वरती म्हटल्या प्रमाणे इथला ग्राहक संख्या आणि वैविध्य या बाबतीत पूर्ण आहे; म्हणूनच उद्योग धंदे इथे आहेत.  ते नसतं तर उद्योग धंदे इथे थांबलेच नसते.  उदाहरणार्थ एक नवीन हॉटेल चालू झालं की तिथे नोकरांना रोजगार मिळतो, भाजी विक्रेते, फर्निचर विक्रेते, कप बश्या चमचे भांडी कुंडी विक्रेते आणि अश्या बऱ्याच छोट्या मोठ्या धंद्यांना एक नवीन गिऱ्हाईक मिळतं.  त्यांचा धंदा वाढतो त्यांच्या बरोबर त्यांच्या पुरवठादारांचाही धंदा वाढतो.  वाढत जाणाऱ्या धंद्यांबरोबर ही सारी प्रणालीही वाढत जाते, त्यानं सारं अर्थकारण (economy) वाढत जातं आणि त्याचा फायदा संपूर्ण समाजालाच मिळतो. या प्रणालीची सुरवात तुमच्या माझ्यापासूनच होते.