वा योगेश, ही कविता खूप गंभीर आहे आणि खूप सुंदर आहे. पण त्याने मला कॉलेजच्या दिवसांमधली एक मजेदार आठवण करून दिली. 

कॉलेजची पहिली दोन वर्षं मी मराठी साहित्य घेतलं होतं. बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, अधून मधून संदर्भाच्या निमित्ताने दि. पु. चित्रे, भा. रा. तांबे, मर्ढेकर यांचं वाचन आम्ही करायचो. मनापासून चर्चा करायचो तास संपून जायचा पण चर्चा संपायच्या नाहीत! वाङ्मय मंडळात चर्चा करायचो. मधनंच किडे सुचायचे. मजा यायची.

पण इतकं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, अर्थाचे तरल पदर शोधले तरी परीक्षेत आम्हाला अगदी ठरीव असे दोनच प्रश्न विचारायचे....

अमुक कवितेतून तमुक कवीचा जीवनविषयक दृष्टिकोण कसा दिसतो ते स्पष्ट करा

किंवा

अमुक कवितेतून तमुक कवीचा काव्यविषयक दृष्टिकोण कसा दिसतो ते स्पष्ट करा.

जी चर्चा केली ती कसा संबंध जोडून आपण या उत्तरात लिहिली, कुठला मुद्दा कसा जोडून घेतला याच्या कथा आम्ही पेपरानंतर एकमेकांना सांगत बसायचो, शाब्बासक्या द्यायचो घ्यायचो, उत्तरांना सुंदर बिंदर शेरे मिळायचे.....

तुमची ही कविता काव्यविषयक दृष्टिकोण आणि जीवनविषयक दृष्टिकोण या दोन्ही वर्गांत चपखल बसणारी वाटली आणि हे सगळं आठवलं.

कविता तर सुंदर आहेच पण या आठवणींबद्दल विशेष धन्यवाद!