विक्रम-वेताळच्या गोष्टीत ही गोष्ट मी कधी ऍकली नाही. तुम्ही कोणी ऍकली असेल तर नक्की सांगा. पण खरंच मस्त विषय आही ना? या गोष्टीसाठी. कधीही संपणार नाही आणि प्रत्येक्वेळी वेगळी शक्यता बरोबर वाटेल.

तर मुळ मुद्याला येऊ. मुलीने सासरच्या पद्धती शिकल्या पाहिजेत यात दुमत नाही. [मी ही एक सूनच आहे तरीही हेच म्हणेन] कारण ज्या घरात आयुष्यभर रहायचे त्यांच्यासारखेच वागायला हवे हे  आम्हा सुनांना मान्य. जर भविष्यात कधी उलटा कायदा झाला तर मुलांनी हे सगळे आत्मसात करावे. 

* पण यासाठी सुनेला थोडा वेळ द्यायला हवा. तिला आपल्याकडे काय काय पद्धती आहेत हे सांगताना सासुला त्या पक्क्या माहित हव्यात. त्याच नसतील तर पुढे कोणतीही अपेक्षा ठेवणे किती  योग्य हे सासरच्यांनी  ठरवावे.

*जर सुनेने मग आपल्या इतर चुलत सासवांना विचारून काही केले तर मानापमानाचे नाट्य न व्हावे.

*तिने सारे आत्मसात केले तर एखाद्यावेळी तरी कौतुकाचा स्वर तिच्यापर्यंत पोहोचवावा. याउलट दुसरे कोणी कौतुक केले तर, "केले म्हणून काय ते मोठे करते. लग्न झाले म्हणजे हे करायलाच हवे. " "करते हो पण तोंडात प्रत्येकवेळी माझ्या माहेरी हे असे असते ह पट्टा चालू असतो. " ही आणि अशी अनेक प्रकारची वाक्ये कोणाही समोर बोलू नयेत. आणि थोडा धीर धरावा काही वर्षांनी आम्ही म्हणू की "माझ्या सासरी हे असं असतं." तेव्हा सहाजिक आनंदच होईल ना?

* आणि जावई सासरी येणार म्हणून तीच सासू झटत असते. कारण तो तिच्या मुलीचा नवरा असतो. म्हणजे दुधावरची साय. पण सून म्हणजे मुलीसारखी असते. पण मुलगी नसते. म्हणजे दुधाची खरवड..सासुच्या दृष्टीने दुधाचा शुभ्रपणा घालवणारी. म्हणून म्हणतात स्थानमहात्म्य फार मोठे आहे.

*तर मुलीने बदलावे ही जशी अपेक्षा करतात तसे आपणही तिच्या माहेरच्या मंडळींमध्ये सामावले पाहिजे. [वेळप्रसंगी तरी] एवढा आपलेपणा तिच्याबद्दल सासरच्या मंडळींनी दाखवावा. आणि तिने तशी अपेक्षा केली तर तिला तिच्या तोंडावर दुखवू नये. ऍवढा समजूतदारपणा दाखवावा.

*जशी सून आपल्या घरात आली तसा आपला मुलगाही त्यांचा कोणी तरी झाला आहे हे मुलाच्या आईने गृहीत धरायला हवे. फक्त मान घेण्यापुरताच तो त्या घराचा जावई आहे ही जाणीव त्या मुलीला सारखी करून देवू नये.

*आणि जी सासू मुलीला  माहेरचा तोरा दाखवण्याबद्दल दोष देत असते ती सासू दोन दोन मुलांची लग्ने झाली तरी प्रत्येक गोष्टीत आपला भाऊ हवा हा हट्ट धरत असते. किती हा विरोधाभास?

मुलीने लग्नानंतर सासरच्या मंडळींप्रमाणे वागायला हवे या मताची मी आहे. पण जिथे वर दिल्याप्रमाणे परिस्थिती असेल तिथे माझे हे मत ठेवणे चुकीचे आहे. तिथे  मुलीने या सगळ्यासाठी सासरी धीटपणे जाब विचारयलाच हवा ना? अगदी स्त्रीमुक्ती आंदोलने वगैरे याच्या मी विरुद्ध आहे पण याची कधीतरी स्पष्ट चर्चा व्हावी. आणि यासाठी तिने आपल्या पतीकडून सहकार्याची नक्की अपेक्षा करावी.

काही सासु-सासरे याला अपवाद नक्की असतील. पण सगळेच बदलावेत आणि एखादे अपवाद म्हणून असे वागावेत. खरंतर ते ही नको पण त्या शिवाय नियम बनत नाही ना!!!!!