मटामध्ये "हसा लेको" मध्ये एक कविता आली होती. आता निश्चित शब्द आठवत नाहीत. पण मी 
त्याच दिवशी त्याचा इंग्रजी अनुवाद करून ठेवला होता. ती कविता हलकेच घ्यावी ही पुन्हा एकदा 
कळकळीची विनंती.    

  

मी बनवलेल्या पोळ्या खाताना 
त्याला रबर खाल्ल्यासारखे वाटायचे,  
माझ्या हातची आमटी भुरकताना त्याला 
त्याच्या आईची आठवण यायची,  

माझ्या हातच्या चहाला कधीच त्याच्या 
आईच्या हाताची चव यायची नाही,  
त्याची आई सुग्रण होती आणि 
माझा स्वैपाक बेचव होता,  

दिवसरात्र विचार करकरून 
माझे डोके भणभणू लागले,  
कधीच नाही का मला 
जेवण बनवता येणार 
त्याच्या आईच्या सारखे?  

आणि एका छानश्या सकाळी,  
एक मस्त कल्पना सुचली,  
मी जेवणासाठी त्याची आतुरतेने 
वाट पहायला लागले,  

नेहेमीप्रमाणे तो, आईसारखा स्वैपाक 
झाला नाही
 असे कुरकुरू लागला,  

लगेचच मी त्याला एक श्रीमुखात 
दिली अगदी त्याच्या आईसारखी 
आणि काय आश्चर्य,  हा प्रश्नच 
संपला अगदी कायमचा...  :)