दिवाळीचे वर्णन वाचून आनंद वाटला. अशी दिवाळी मला तर नाहीच पण माझ्या आईबाबांनाही साजरी करायला मिळाली नाही याचे थोडे वाईटही वाटले. एकत्र येण्याने, खेळण्याने, सगळ्या गोष्टी वाटून घेण्याने किती मजा येत असेल!

शिवाय थोडे प्रश्नही पडले. मेजवानीच्या पंक्तीत वाढप कोण करत असे? मागून जेवणाऱ्या त्या व्यक्तींची जेवणे कशी होत? एखाद्या दिवशी नेहमीहून खूप अधिक खाणे म्हणजे मेजवानी का?

मध्यंतरी एक (अभारतीय) मैत्रिण म्हणाली, "माझा देवावर विश्वास नाही, पण सणांवर आहे!" तेव्हा पूजेचे फारसे अवडंबर नसणाऱ्या, देवळात जाण्याची सक्ती नसणाऱ्या आपल्या सणांविषयी बरे वाटले होते. त्या भरात मी तिच्याशी सहमती दर्शवली होती.

पण गेल्या महिन्यातील जाळ्यावरील 'अशी आमची दिवाळी' विषयावरचे लेख वाचून असे वाटू लागले होते की आपल्याला सणांविषयी फारशी ओढच नाही! दिवाळीला सभोवताली आप्तस्वकीय, फटाके, फराळ, दिवे असे काही नसले तरी आपल्याला चुकल्यासारखे वाटत नाही. हा लेख वाचून समज पक्का झाला. काय काय धरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा, नि कसा?