चांद्रयान पाठवण्यामागचा  उद्देश फक्त इतरांनी मिळवलेलीच माहिती पुन्हा एकदा मिळवणे किंवा केवळ भूगोलाच्या पुस्तकात नवीन धडा टाकण्याइतपत मर्यादित समजू नये.  उलट चांद्रयानाचा यशस्वी प्रवास हा आपण आपल्या तांत्रिक वैज्ञानिक प्रगतीचा एक मोठा पुरावा समजला पाहिजे.  आपल्याला या मोहिमेच्या उद्देश्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर या  

दुवा क्र. १     ठिकाणी टिचकी मारून आपल्याला ती मिळू शकेल.

मी स्वतः अशा मताचा आहे की, भारताची स्ट्रॅटेजी ही जगातली एक अतिउत्कृष्ठ म्हणता येईल एवढी चांगली स्ट्रॅटेजी आहे.  यात एका बाजूनं शास्त्रीय, वैज्ञानिक, तांत्रिक प्रगतीवर जोर द्यायचा, ज्यायोगे इथल्या उद्योग धंद्याना त्याचा फायदा मिळून आर्थिक क्षेत्रात भारताची प्रगती होईल आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण, सामाजिक उन्नती, आरोग्य या गोष्टींवर भर देऊन इथल्या नागरिकांना जास्तीत जास्त स्वयंपूर्ण बनवायचं.  अशी दुहेरी रणनीती माझ्या माहितीत तरी दुसऱ्या कुठच्या विकसनशील देशाची नाही.

पण या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आपले महान नेते आणि अधिकारी मंडळी.  चांगल्या कल्पनांचा संपूर्ण बोजवारा कसा उडवायचा हे यांच्या पेक्षा जगात दुसऱ्या कोणालाही चांगलं जमत नसेल.  ज्याप्रमाणे एखादं डुक्कर सदोदित गटाराच्या पाण्यातच लोळत असतं, त्याप्रमाणेच हे लोक सतत भ्रष्टाचारात लडबडलेले असतात.  त्यामुळे चांगल्या चांगल्या योजनांमधून फक्त चोऱ्या कशा करायच्या आणि पैसे कसे लाटायचे एवढाच विचार हे लोक सतत करत असतात.  या देशातले सगळ्यात मोठे देशद्रोही हे आहेत.  बेरोजगारी, दहशतवाद, पाणी टंचाई, सार्वजनिक अनारोग्य, प्रदूषण, रस्त्यांची अनावस्था या सगळ्या समस्यांच्या मुळाशी हाच भ्रष्टाचार आहे आणि या समस्यांचा दोष चांद्रयानासारख्या वैज्ञानिक प्रगतीला देणं गैर आहे. 

त्यामुळे वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक प्रश्न हे दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र प्रश्न आहेत आणि यांची गल्लत केली जाऊ नये असं मला वाटतं.