सुरेश कलमाडी - पुण्याच्या वाहतूकव्यवस्थेची लावलेली संपूर्ण वाट, आणि त्याबाबत असलेली शून्य लाज. 'माझ्याविना पुण्याला वाली नाही' अशी दर्पोक्ती. महापालिकेतल्या अंतर्गत निवडणुका थांबवून 'कलमाडी हाऊस'वरून चिठी पाठवण्याची पाडलेली प्रथा.

जयंत पाटील - पायाभूत सुविधांमध्ये कुठलीही गुंतवणूक नसलेले नीरस अर्थसंकल्प. (वाळवा तालुका पंचायतीचा अर्थसंकल्प तयार करतानाही ज्यांची फेफे उडाली असती त्यांच्या ताब्यात राज्याचा अर्थसंकल्प आल्यावर अजून काय होणार?) पिताजी राजारामबापू यांच्या चांगल्या प्रतिमेच्या फिक्स्ड डिपॉझिटवर आजवर गुजराण.

दिलीप वळसे-पाटील - विजेच्या बाबतीत महाराष्ट्राला दयनीय अवस्थेत नेणे, आणि त्याबद्दल 'माझ्या हातात काय जादूची कांडी आहे का' असे बरळणे; MKCL नावाचा बिनकामाचा हत्ती पोसत राहणे, आणि त्याला चारा मिळावा म्हणून सरकारी नोकरीसाठी MS-CIT हा कालबाह्य आणि हास्यास्पद कार्यक्रम सक्तीचा करणे

हर्षवर्धन पाटील (अजून एक पुतणे) - युती आणि आघाडी या दोन्ही सरकारांत मंत्रीपद टिकवलेले स्वनामधन्य महंत. त्यासाठी राजकीय तत्त्वे, विचार, असल्या बिनकामाच्या गोष्टींना घातलेली लाथ. पुढचे सरकार अगदी बसपाचे आले तरी त्यात मंत्रीपद मिळावे म्हणून अपक्षांची मोट बांधून तयार असणे.

अशोक चव्हाण - कुठलेही खाते तितक्याच बेपर्वाईने चालवण्याची कला. (सांस्कृतिक खाते असले तर वृद्ध कलावंताना मिळणारी निवृत्तीवेतने वर्षानुवर्षे थकवणे; उद्योग खाते असले तर 'डाऊ'बद्दल मिठाची गुळणी धरून बसणे) वडिलांच्या पुण्याईचे फिक्स्ड डिपॉझिट खासदारकी + केंद्रीय गृहमंत्रीपद एवढे होते. त्याचे तुकडे मोडत आता आमदारकी + राज्यातील एक दुय्यम दर्जाचे मंत्रीपद एवढे शिल्लक ठेवणे. 'फोडा आणि झोडा' नीतीचा प्रयोग भास्करराव पाटील खतगावकर या सख्ख्या मेव्हण्यावरच करणे.

विलासराव देशमुख - 'लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' ही म्हण खरी आहे, आणि आपण म्हणजेच तो 'पोशिंदा' या भ्रमात सदैव असणे. कुठल्याही प्रश्नावर गुळमुळीत भूमिका घ्यायला तत्पर असणे. राज्य चालवण्यासाठी मुंबईत असायची गरज नाही, ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून किंवा बाभळगावमधूनही तेवढ्याच भयानक रीतीने चालवता येते हे सिद्ध करणे.

आर आर पाटील - 'गय केली जाणार नाही', 'चौकशी चालू आहे', 'कडक अंमलबजावणी केली जाईल' ही टकळी चालवणे. आणि मधूनमधून चवबदल म्हणून 'कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू' अशी स्वतःच्या उंदीरव्यक्तिमत्त्वाला न झेपणारी सिंहगर्जना करणे (ही गर्जना खाजगी सावकारांबद्दल केली होती; दिलीप सानंदा हे एक खाजगी सावकार, ज्यांच्या तगाद्याला भिऊन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या; सानंदा हे काँग्रेसचे आमदार, त्यामुळे त्यांच्या कोपरापासून ढोपरापर्यंत गोंजारायचीही पाटलांची हिंमत नाही)

हे लोक 'शहाणे' आहेत, आणि 'त्यांनी कार्यक्षमता दाखविली आहे' असे म्हणायचे झाले तर तोच न्याय अजित पवारांना लावून टाका की! शेवटी काय, "उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे" हेच खरे.