पेंटर पुराणिकांनी रंगवलेली 'डोंगरे बालामृत' ही पाटी प्रसिद्ध होती.  भल्या मोठ्या उंच उभ्या भिंतीवर असलेल्या खिडक्यांच्या आवतीभोवती डों किंवा ला ह्या अक्षरांचे फरकाटे येत.  खिडकी उघडी असो की बंद, डोंगरे बालामृत वाचता येई.  त्यांच्या 'डॉक्टर वामन गोपाळ यांचा सार्सापरिला', 'झंडू रक्तो फॉस्फो माल्ट', 'जीपला ग्राईपवॉटर', आणि 'जाई काजळ' यासारख्या आणखी काही जाहिराती भिंतींची शोभा वाढवीत असत.

असेच एक पेंटर सिनेमाची भलीमोठी पोस्टर्स रंगवीत असत. त्यांनी एका हिंदी चित्रपटाची परदेशात पोस्टर्स रंगवली होती. ती पोस्टर्स रंगवताना पाहणारी जनता आणि तिथले पेंटर आश्चर्यचकित झाले.  अशा त्या अद्वितीय भारतीय पेंटरच्या कलेचा परदेशात बराच गाजावाजा झाल्याचे आठवते. वर्तमानपत्रांतून त्यांच्यावर लेख लिहिले गेले, आणि त्यांच्या काही पोस्टर्सना संग्रहालयात ठेवण्यासाठी मागणी आली.  त्या पेंटरचे नाव मात्र मला आठवत नाही.