पुस्तकाच्या शेवटाने जिभेला थोडा कडवटपणा आल्यावाचून राहिले नाही. बहुतांश ठिकाणी लेखिकेचा बराच लिबरल दृष्टिकोण दिसत असला तरी हिंदू धर्म आणि भारताबद्दलची मते फारच पूर्वग्रहदूषित वाटली. या दोन्ही बाबतींत मी अगदी मवाळ आहे. मात्र तरीही लेखिकेची काही मते ही जनरलाईज करणारी वाटली. अर्थात प्रवासातील सामानामध्ये असलेल्या नेहरूंच्या पुस्तकाचा उल्लेख पाहता हा दृष्टिकोण कोठून आला असावा याची किंचित चुणूक मिळते. मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील प्रवासादरम्यान - यात अझरबैजान मधील घटनांबाबत लेखिकेने दाखवलेला समजूतदारपणाही आला. -  मोकळी ठेवलेली मनाची कवाडे भारतात प्रवेश करताना लेखिकेने बंद केली होती असे वाटते. (फार आलंकारिक झाले का?)

असो.

मात्र एकंदर पुस्तक फारच भन्नाट आहे. लेखिकेचा रोम्यांटिकवादाकडे झुकणारा दृष्टिकोण व भारताविषयीचे पूर्वग्रह यांना थोडे डिस्काउंट केल्यास हे पुस्तक एक अप्रतिम दस्तावेज आहे यात काहीच शंका नाही. याच लेखिकेने दक्षिण भारतात स्वतःच्या ६ वर्षाच्या मुलीसह पायी केलेल्या प्रवासांबद्दलही एक पुस्तक लिहिले आहे. ज्याच्या प्रस्तावनेतून तिचे उत्तर भारतातील अनुभवांवरून एकंदर भारताबद्दल झालेले मत बदलले असण्याची शक्यता वाटते.


आपला,
(हावरा वाचक) आजानुकर्ण