प्रतिसादाबद्दल मनापासून आभार, ऋचा [ (इथं मी 'देवी असंही लिहिणार होता हां... :) ]
...
काही शब्द, काही कल्पना आणि खरंतर काही Motif-s (मोटिफ - याला मराठीत चांगला प्रतिशब्द मला तरी सापडलेला नाही ) अशी असतात की आपल्या मनात घर करतात.
- १) खरंय... आणि हे घर नेहमीसारखं चौकोनी नसतं... वर्तुळाकार असतं... माणूस त्या वर्तुळातच फिरत राहतो...
२) Motif  - या इंग्रजी शब्दासाठी (एखाद्या कलाकृतीत पुनःपुन्हा, वारंवार येणारे)  कल्पनावर्तन, विचारावर्तन (कल्पना + आवर्तन, विचार + आवर्तन)  हे दोन पर्यायी शब्द [मला तरी :)] सुचले.  

...
आणि आपण व्यक्त होतो तेव्हा आपला अंश म्हणून ती आपोआपच व्यक्त होतात; एकदा असो वा अनेकदा, ती त्या कवीची पहचान होतात.
- हेही अगदी खरंय... [ (इथं  'पहचान'च्या जागी, मायमराठीला अगदी अगदी ओळखीचा असलेला,  'ओळख' हा शब्द मला सापडला! :) ]

...
बा. भ. बोरकरांचा गहिरा निळा रंग, मर्ढेकरांचे उंदीर, तांब्यांचा मधुघट तसा तुमचा हा मारवा!
- अरे! चेष्टा करताय की काय माझी?   कुठे हे दिग्गज कवी आणि कुठे मी?   भर्जरी वस्त्रांना माझे चिरगूट नका हो बांधू! मला बरे वाटणार असले तरी त्या महावस्त्रांचा तरी विचार करा जरा. :)
...
प्रामाणिकपणे सांगते की मी तुमचं मागचं साहित्य आवर्जून शोधून वाचलेलं नाही
- काहीच हरकत नाही. तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवता येईल... म्हणजे ठेवलेलाच आहे मी. :)
...
पण असं वाटलं तुमची ही कविता आणि हा प्रतिसाद वाचून की तुमच्या कवितेत मारवा अनेक वेळा येत असला तरी दरवेळी तो राग नसेल, पण त्याला एक खास व्यक्तित्व तुमच्या कवितेत नक्कीच असेल. त्या त्या वेळेला तुम्हाला जे महत्त्वाचं म्हणायचं असेल ते म्हणजे मारवा असेल.
- हां... हे अगदी नेमकं ओळखलंत. बडे गुलाम अली खॉं, वसंतराव देशपांडे यांचे 'मारवे' मनात अगदी मिसळून गेलेले आहेत. कातरवेळ या शब्दातील कातर या शब्दाचा नेमका अर्थ मारव्याशिवाय दुसरा कोणता राग सांगेल???
हा मारवाच कधी (या क्षणी असणाऱ्या; पण पुढच्याच क्षणापासून कधीच नसणाऱ्या) आईचा  चेहरा बनून, कधी वडिलांच्या तोंडी सतत असणाऱ्या जुन्या जुन्या मराठी भावगीतांपैकी एखादं गाणं ओझरतं ऐकू आल्यानंतर आतून येणारी उचंबळ बनून,
कधी भावंडांच्या एखाद्या न संपणाऱ्या दुःखाचा सल बनून,   कधी कुणीतरी खूप जवळ आलेलं असतं; पण पुन्हा दूर गेल्यानंतरच तो 'जवळ'पणा कळतो आणि मग हुरहुरीशिवाय 'जवळ' काहीच उरत नाही... अशी एकटी; एकाकी हुरहूर बनून, कधी प्रत्येकच बाबतीत स्वतःची झालेली वंचना बनून,  कधी या सगळ्या आठवणींचीच एक मोठ्ठी आठवण बनून... अशा अनेक रूपांत येत असतो मारवा... मारव्याची किती रूपं सांगावीत? असो!
...

कशाला असे प्रश्न पाडून घेता?
- काय करू? पडतातच! :)  पण आता नाही पाडून घेणार. :) :) :)
...

तुम्ही पुढे जे म्हटलंत तेच खरं!
पण काही काही मोहांपुढे हतबल होण्याशिवाय पर्यायच नसतो. मारवा हा त्यातलाच एक! :)
.... अशी हतबलता तुम्हास कायम येवो ही ईश्वराकडे प्रार्थना.....!

- अगदी...! असं नेहमीच हतबल होणं मलाही आवडेल!
...

सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा....

- प्रदीप कुलकर्णी