त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम परंतु हौतात्म्याचे गोडवे गाणाऱ्यांना गप्प करण्याची वेळ आली आहे.

सहमत आहे. वेळ काळ पाहून बोलायची पद्धत अनेकांना नसते त्यातलाच प्रकार.

अरे! कोण भेकड? २५-३० जण येऊन शेकडोंना संपवून जातात ते?

निःसंशय! कारण हे २५-३० निशस्त्र आले आणि अचानक लोकांना चोपू लागले तर समजू शकेल परंतु सशस्त्र मारेकरी जेव्हा म्हातारे-कोतारे, बायका, मुले न बघता बेसावध लोकांना ओलीस धरत असतील तर भेकड तेच आहेत. शूर अद्यापही आमनेसामने लढतात असाच माझा ग्रह आहे.

त्यांच्यासारखे शौर्य कोणीही येरागबाळा दाखवू शकतो. त्यासाठी बंदुका हातात धरण्याची गरज नाही. फक्त लक्ष्य बदलायला लागेल. आज हॉटेल्स लक्ष्य झाली आहेत,  उद्या शाळा, बालवाड्या लक्ष्य होतील. पोलीसी यंत्रणा कुठे कुठे रक्षण करणार असा प्रश्न आहे.

जगातल्या दुसऱ्या सर्वोत्तम पोलिस यंत्रणेला आणि सर्वोत्तम सैन्याला गुंगारा देत २-२ दिवस जेरीस आणतात ते?  पोलिसांचीच वाहनं पळवून चौखूर उधळतात आणि मुंबईबाहेरच्यांच्या उरात धडकी भरवतात ते? वारंवार देशाच्या तळागाळात कुठेही कधीही कशीही दहशत पसरवू शकतात ते? हे भेकड आहेत?

आपली पोलिस यंत्रणा अद्यापही दुसरी सर्वोत्तम आहे का याबाबत मला शंका आहे आणि पोलीस यंत्रणेत बजबजपुरी आहे हे देखील मान्य परंतु सैन्याला गुंगारा द्यायला सैन्य मुंबईची यंत्रणा पाहत नाही. सैन्याला पाचारण करावे लागते. सैन्य येऊन परिस्थिती हाताळेपर्यंत वेळ लागू शकतो. दहशतवाद्यांनी जसा प्लॅन आखलेला असतो तसा सैन्याने त्याक्षणी तो आखलेला असेलच असे नाही. तेव्हा सैन्याला जेरीस आणणे वगैरे शब्दप्रयोग अनावश्यक वाटले.

आपल्या देशाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की हल्ले करण्यास, दहशतवाद माजवण्यास भरपूर जागा आहे. गरीबी, लोकसंख्या, धार्मिक फूट वगैरे सामाजिक कारणे वेगळी. याचा फायदा उठवणे बरेच सोपे आहे. प्रत्येक राज्याला स्वतःची पोलीस यंत्रणा आहे म्हणजेच देशातील पोलीस यंत्रणा ही एकसंध नाही. हा मुद्दा शासनाला किती कमकुवत बनवतो यावर विचार करण्याजोगे आहे.

आज मात्र मुंबईला सावरायला वेळ लागणार आहे, तिला पाठिंब्याची गरजही आहे कदाचित पण पाठिंबा देणारेच जर फक्त स्वतःवर खूष असतील, भ्रमाच्या दुनियेत जगत असतील, आपण अमर असल्याच्या गोड समजुतीत असतील, हल्लखोरांना भेकड म्हणून स्वतःचा भेकडपणा लपवत असतील तर आजही मुंबई तेच म्हणेल कदाचित- अरे, पाहिजे कोणाला यांचा पाठिंबा?

सहमत आहे. मुंबईला राजलक्ष्मी भोसल्यांसारख्या राजकारण्यांचा पाठिंबा कधीच नको होता आणि मुंबईचे कंबरडे मोडले तरी मुंबई नाइलाजाने पुन्हा उभी राहते हे देखील खरे. रोज मरे त्याला कोण रडे हे देखील खरे.

परंतु, अशावेळी मुंबईचे लोक तात्काळ रस्त्यावर उतरून मदत करतात, अन्न पुरवतात, आसऱ्यासाठी आपली घरे उघडतात, रक्तदान करतात त्याला मी खचितच मुंबई स्पिरिट म्हणेन. मी हे २००५ च्या पावसात अनुभवलेले आहे. देव करो आणि इतर शहरांवर अशी पाळी न येवो पण यदाकदाचित आलीच तर मुंबईकरांचे हे स्पिरिट तेथेही दिसो.

(काही भाग संदर्भहीन झाल्याने वगळला. : प्रशासक)