मूळ प्रस्तावाशी आणि त्यावरच्या प्रतिसादांशी पूर्णपणे सहमत. आज या दहशतवादाची ताकत, त्यांचं धारिष्ट्य एवढं वाढलंय की आता ते समोरा समोर तुमच्याशी लढाईला उतरलेत. तुम्हाला तोंडावर आव्हान देतायत. आत्ता हा प्रतिसाद लिहीपर्यंत म्हणजे ही लढाई चालू झाल्यापासून जवळ जवळ चाळीस तासांनंतरही आपल्या सैन्याला यांच्यावर पूर्ण कबजा मिळवता आला नाहीये किंवा यांना पूर्ण नेस्तनाबूत करता आलं नाहीये.
यात सैनिकांच्या शौर्याबद्दल तिळमात्र शंका नाहीये आणि सैनिक यांना पकडल्याशिवाय किंवा ठार केल्याशिवाय राहणार नाहीत हेही नक्कीच. पण याबरोबरच दुसरीकडे या अतिरेक्यांना भेकड म्हणणं हा मूर्खपणा आहे. आपण हे मान्य करू किंवा न करू पण अतिरेक्यांच्या दृष्टिनं बघायचं झालं तर ते त्यांच्या उद्दिष्टांत पूर्णपणे सफल झालेत. त्यांना दहशत पसरवायची होती, त्यांना आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला एक प्रकारची खीळ घालायची होती, भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या मनात शंका उत्पन्न करायची होती, परदेशातून आता वाढत असलेल्या पर्यटकांच्या ओघाला थोपवायचं होतं.... आणि हे सारं करण्यात त्यांना यश मिळालंय.
आणि आपल्या नेतेमंडळींना याची जाणीव तरी आहे का? स्वतःच्या तुमड्या भरण्या पलिकडे यांना काही दिसतं? देशाला या अवस्थेला आणून ठेवण्याची जबाबदारी ही मंडळी स्विकारतील?
माझ्या कामामुळे माझा सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाशी बराच संबंध येतो. त्या अनुभवावरून सांगतो, या देशात शस्त्रास्त्र किंवा दारुगोळा आणणं हे जगात कदाचित सगळ्यात सोपं असावं. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना एखाद्या कंटेनरमध्ये आत काय भरलंय याच्याशी काही देणंघेणंच नसतं. त्यांना फक्त त्याच्यातून त्यांच्या खिशात किती पडणार याचीच पडलेली असते. आणि पैशांची ही पुडकी त्यांच्या अधिकाऱ्यांपासून पार सगळ्या नेतेमंडळीं पर्यंत सगळीकडे वाटली जातात. आणि याची खरी किंमत मात्र मोजतो सामान्य माणूस स्वतःचा जीव, कुटुंब सारं काही गमावून.
ऋचाचा प्रश्न अगदी चपखल आहे - खरे भेकड कोण? अतिरेकी की आमच्याच पैशानी एक्स, वाय, झेड असल्या वेगवगळ्या सुरक्षा घेणारी ही गिधाडं?