अशा प्रकारच्या पुस्तकांमुळे खरोखरीच फायदा होतो का?

अशा प्रकारच्या पुस्तकांमुळे फायदा होतोही आणि नाहीही.  म्हणजे माझ्या तरी मते यांतली, म्हणजे जीवनशैली 'सुधारण्याबाबतच्या' पुस्तकांमधली, कमीत कमी ९०% पुस्तकं रद्दी असतात.  'न्यूयॉर्क्स बेस्ट सेलर' किंवा 'फ्रॉम द रायटर ऑफ अमुक ढमुक' अशी बिरुदं वागवणारी ही पुस्तकं त्यांचं रंगीबेरंगी चकचकीत मुखपृष्ठ बघून कधीही घेऊ नयेत किंवा अगदीच घेण्याचा मोह टाळता आला नाही तर पैसे पाण्यात जाण्याची शक्यता गृहीत धरूनच घ्यावीत.

अर्थात या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे यात ५% पुस्तकं खरंच चांगली असतातही आणि यांचा रोजच्या जीवनात एका विशिष्ट प्रमाणात फायदा होतोही.  अर्थात त्यांचा आपण आपल्या आयुष्यात फायदा कसा करून घेऊ शकतो हे आपल्यावर अवलंबून असतं.  याचा अर्थ 'हाऊ टू विन फ्रेंडस' अशा प्रकारचं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आता तुमच्याकडे नुसता नवीन मित्रांचा ओघ चालू होईल, तर ती चुकीची कल्पना आहे.  पण या पुस्तकांत तुमच्या वागण्यात तुम्ही काय बदल करावेत, सर्वसाधारणपणे लोकांना कशा प्रकारच्या लोकांशी दोस्ती करायला आवडते किंवा खूप मित्र असलेल्या व्यक्तिच्या स्वभावाचे काय विशेष असतात अशा प्रकारची माहिती दिलेली असते.  या माहितीचा उपयोग तुम्ही कसा आणि कितपत करून घेता आणि त्याचा तुम्हाला कितपत फायदा होतो हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. 

मी जिथे नोकरी करतो तिथे माझ्या सेल्स टीमला आम्ही सेल्स मनेजमेंटवरची पुस्तकं वाचायला देतो आणि मुद्दाम साप्ताहिक बैठकांमध्ये या पुस्तकांवर चर्चा घडवून आणतो.  पण माझा अनुभव असा आहे की कुठच्याही दोन सेल्सच्या लोकांना या पुस्तकांचा सारखा उपयोग होत नाही. 

त्यामुळे माझ्या मते अशी पुस्तकं घेताना ती पुस्तकाच्या दुकानात नीट चाळून, त्याची अनुक्रमणिका बघून, शक्यतो अर्धा एक तास बसून त्यातला काही एक भाग वाचून, त्या पुस्तकात तुम्हाला उपयोगी पडू शकेल अशी माहिती कितपत आहे ह्याची खात्री करूनच अशी पुस्तकं घ्यावीत. 

त्याही पुढे जाऊन आधी तुम्हाला काय हवंय ते तुम्ही निश्चीत करणं आवश्यक असतं म्हणजे तुम्हाला मित्र कसे मिळवावेत यावर माहिती पाहिजे का तुम्हाला स्वतःची स्मरण शक्ती कशी वाढवावी ही माहिती पाहिजे का सेल्स मॅनेजमेंटबद्दल माहिती पाहिजे या बाबत मनात पूर्ण स्पष्टता हवी.  मग योग्य पुस्तकाचा शोध घेणं सोपं ठरेल.  नुसतंच पुस्तकाचं मुखपृष्ठ / मलपृष्ठ बघून घेतलेलं पुस्तक म्हणजे पदरी निराशा पडण्याची जवळ जवळ खात्रीच!!