ऋचा,
अगदी मनातलं बोललात!
ह्या युद्धात धारातीर्थी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारे, अजूनही लढणाऱ्या पोलिस आणि सैन्यातल्या वीरांना 'सॅल्यूट' करणारे मुंबईकरांच्या 'स्पिरिट'ला 'सलाम' करणारे असंख्य एसेमेस कालपासून आले आहेत. 'अमुक साइटवर जा आणि आपला आवाज उठवा', 'पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निषेध नोंदवा' अशी अनेक मेल्स कालपासून येताहेत. जणूकाही आपण त्या संकेतस्थळांवर जाऊन जर आपले मत व्यक्त केले नाही तर ह्या निषेधाची नोंद कुठेही होणार नाही. जणू निषेधाची जोवर अशा तऱ्हेने नोंद होत नाही तोवर पंतप्रधानांना/मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळणार नाही. (कदाचित अशी नोंद होऊनही त्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळणार नाही. पण तो मुद्दा वेगळा...)
अत्यंत सूत्रबद्धपणे, योजनाबद्ध रीतीने हा हल्ला करणारे भेकड नव्हेतच. त्यांनी त्यांचा हेतू अत्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास नेला. नुसता निषेध व्यक्त करून काहीही साध्य होणार नाही.
पंतप्रधानांच्या वक्तव्यावरील माझ्या एका मैत्रिणीची प्रतिक्रिया:
"माननीय पंतप्रधान, आपण निषेधपर, सांत्वनपर काय बोललात ते आम्हाला माहीत नाही. कारण, आम्हाला त्यावर वाया घालवण्यासाठी तेवढा वेळ नाहीये. 'आमची' अनेक माणसं अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे अडकून पडली आहेत, काही जण त्या हल्ल्यांची शिकार होत आहेत. त्यांना काय मदत करता येईल ह्याचा विचार करण्यात आमचा वेळ गेला. अजून एक म्हणजे अशा वेळी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं कारण तुम्ही अशा वेळी काहीही कामाचे नसता हे आधी घडलेल्या अनेक घटनांनी सिद्ध केलं आहे. कदाचित आम्ही आमच्या देशाच्या 'माननीय' पंतप्रधानांचा अवमान करत असू पण आपण मानाच्या योग्य आहात असं आम्हाला तरी वाटत नाही.
आमच्या लढवय्या सैन्यावर आमचा विश्वास आहे, आपल्यावर नाही. सैन्याची शक्य तितकी मानहानी करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यात आपण आणि आपल्यासारखे इतर राजकारणी आघाडीवर असतात आणि धन्यता मानतात. हल्ली तर प्रसिद्धिमाध्यमेदेखील आपल्याला साथ देत आहेत. तेव्हा आपल्याला हौस असल्यास आपण ही भाषणबाजी सुरू ठेवावी, आम्हाला हरकत घेण्याइतकाही वेळ नाहीये. धन्यवाद!"
कालच बातम्या बघताना एका वाहिनीवर घटनास्थळीच्या प्रतिनिधीने हेमंत करकऱ्यांवरील हल्ल्याचे वर्णन केल्यावर स्टुडिओमधील प्रतिनिधीने लागलीच निष्कर्ष काढला की हे करकऱ्यांना मारणे हाच दहशतवाद्यांचा हेतू असावा. दुसऱ्या एका वाहिनीवरील वृत्तनिवेदिकेने मरण पावलेल्यांच्या संख्येचा तपशील देऊन असेही सांगितले की मरणाऱ्यांमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे म्हणजे दहशतवाद्यांचा उद्देश इथल्या भूमीवर येणाऱ्या परक्या लोकांना विरोध करणे हाच आहे. ही आपल्या प्रसिद्धिमाध्यमांची जबाबदारीची जाणीव!
अशा वेळी आठवते ती तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन ह्यांनी २००२ साली चेचेन फुटिरतावाद्यांनी मॉस्कोमधील एका रंगमंदिरातील जवळपास ८५० ते ९०० लोकांना ओलिस ठेवल्यावर केलेली कारवाई. मॉस्कोचे तत्कालीन महापौर युरी लुझ्कोफ ह्यांची ह्या कारवाईनंतरची प्रतिक्रियादेखील लक्षात घेण्यासारखी आहे. "आम्हाला शक्यतो शांततापूर्ण बोलणी करूनच ह्या पेचातून मार्ग काढायचा होता. पण अतिरेक्यांनी ओलिसांना मारणे सुरू केल्यावर आम्हाला हल्ला करणे भाग पडले."
रशियन सुरक्षा दलांनी चढवलेल्या ह्या हल्ल्यात ३०-३२ चेचेन अतिरेक्यांसह जवळपास सव्वाशे नागरिक मारले गेले. इतके नागरिक मारले जाऊनदेखील रशियन प्रसिद्धिमाध्यमांनी, जनतेने व्लादिमिर पुतिनना नावं ठेवली नाहीत हे विशेष.
अशा कारवाया करण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती लागते, जी आपल्या राजकारण्यांकडे औषधालादेखील नाहीये. त्यामुळेच ५ पाकिस्तानी दहशतवादी IC-814चं अपहरण करू शकतात, अमृतसरला त्या विमानात इंधन भरलं जातं आणि ते उडून भारतीय वायुसेनेची सीमा ओलांडून कंदाहारपर्यंत सहजपणे पोचतं. अमृतसरलाच त्या विमानाचे टायर निकामी करून कारवाई करता आली असती. पण नाही.
दुसरीकडे आपली प्रसिद्धिमाध्यमे स्वतःचीच प्रसिद्धी कशी वाढेल हे पाहण्यात गुंतले आहेत आणि आपल्यासारखे नागरिक, चार आठ्या कपाळावर आणून 'कसं होणार या देशाचं? या सगळ्यांना पकडून ठार मारलं पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत.' अशा भाकड चर्चा करतात, चारदोन एसेमेस आणि (फुकट असल्यामुळे) पाचसात मेल्स पाठवून कर्तव्य बजावल्याचं समाधान मानतात आणि 'आपण तरी काय करणार? ' म्हणत परत तसंच सुस्त, अजगरी आयुष्य जगू लागतात.
(काही भाग संपादित : प्रशासक)