..त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम परंतु हौतात्म्याचे गोडवे गाणाऱ्यांना गप्प करण्याची वेळ आली आहे.
दुसऱ्याच्या हौतात्म्याचे पोवाडे गाणे ही सर्वात सोपी गोष्ट. स्वतः काहीही न करता स्वतःचे इन्स्टंट मोठेपण (स्वतःच्याच मनात) प्रस्थापित करण्याचा सामान्य आणि हमखास मार्ग. सगळीकडेच दिसते. मानवी स्वभावाला औषध नाही.
कारण हे २५-३० निशस्त्र आले आणि अचानक लोकांना चोपू लागले तर समजू शकेल परंतु सशस्त्र मारेकरी जेव्हा म्हातारे-कोतारे, बायका, मुले न बघता बेसावध लोकांना ओलीस धरत असतील तर भेकड तेच आहेत. शूर अद्यापही आमनेसामने लढतात असाच माझा ग्रह आहे.
दहशतवाद्यांचे कोठल्याही प्रकारचे समर्थन करण्याचा हेतू नाही (समर्थन करण्यासारखे त्यात काहीच नाही, आणि कोणीही in his/her right senses याचे समर्थन करेल असे प्रामाणिकपणे वाटतही नाही; एकंदरीत सगळा घृणास्पद आणि संतापजनक प्रकार आहे याबद्दल कोणाचेच दुमत नसावे.), आणि त्यांनी जे काही केले ते शौर्य निश्चितच नव्हे, पण याला भेकडपणा म्हणता येईलच का? एका प्रकारची आत्यंतिक विकृती, निश्चित. निर्ढावलेपणा, हलकटपणा, क्रूरता, होय, म्हणता येईल. Criminal bent of mind? अर्थात. भेकडपणा? असेलही कदाचित, पण मला दाट शंका आहे.
हे कोणी मूठभर अतिरेकी नाहीत जे ओलिसांबद्दल, ज्यांचीज्यांची म्हणून हत्या त्यांनी केली त्यांच्याबद्दल, त्यांच्या गोळीबाराच्या कक्षेत येण्याचे दुर्भाग्य ज्यांना लाभले त्यांच्याबद्दल किंवा एकंदरीत मुंबईकरांबद्दल वैयक्तिक द्वेषापोटी येऊन गोळीबार करत आहेत, हत्या करत आहेत. हे हत्याकांड तात्कालिक वैयक्तिक द्वेषातून झालेले नाही, तर नियोजनबद्ध आहे आणि एका मोठ्या कारस्थानाचा हे दहशतवादी केवळ एक छोटा भाग आहेत. किंबहुना यामागच्या नियोजनामागचे डोके त्यांचे निश्चित नसावे, ते इतरत्र असावे हे उघड आहे.
मारेकऱ्यांच्या दृष्टिकोनातून / मानसिकतेतून या हल्ल्यामागचे तात्कालिक, प्राथमिक उद्दिष्ट काय याचा विचार करू. हल्ल्यामागचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मुंबईच्या (पर्यायाने देशाच्या मुख्य आर्थिक केंद्राच्या आणि मोठ्या लोकसत्ताकेंद्राच्या) जनतेत भयंकर दहशत माजवणे, ज्यायोगे मुंबईकरांचाच नव्हे तर एकंदर देशाचाच आपल्या सुरक्षेबद्दल असणारा विश्वास डळमळीत होईल. यासाठी प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे मुंबईत अत्यंत अंदाधुंद पद्धतीने हत्याकांड सुरू ठेवणे. आता हे जर उद्दिष्ट असेल (मुळात निष्पाप सामान्य जनतेचा indiscriminately बळी करणे हाच जर स्ट्रॅटेजीचा भाग असेल) तर आपल्याला भेकड म्हटले जाईल या भीतीपोटी असे मारेकरी एक तर स्वतः निःशस्त्र होऊन येतील किंवा ज्यांचा बळी करायचा त्यांना प्रथम शस्त्रे वाटतील असे वाटत नाही. तसे करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून शौर्याचे नव्हे तर मूर्खपणाचे, किंबहुना आत्मघातकी लक्षण ठरेल. मारेकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ओलीस तसेच बळी हे बेसावध आणि निःशस्त्र असलेलेच श्रेयस्कर. तसेही अशा हत्येतून आपण भेकड ठरतो का याचा विचार मारेकरी सहसा करत नसावेत. त्यांना ते सोयिस्करही नसावे.
त्यामुळे मारेकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले असता या परिस्थितीत त्यांनी जे काही केले त्यापेक्षा काही वेगळे केले असते तरच आश्चर्याची बाब ठरली असती. त्यामुळे याला भेकडपणा म्हणावे किंवा कसे हे कळत नाही. बेसावध नि:शस्त्र जनतेवर हल्ला म्हणून हे भेकडपणाच्या व्याख्येत बसत असेलही कदाचित, पण त्यांच्याकडून यापेक्षा काही वेगळी अपेक्षा ठेवता आली असती असे वाटत नाही.
हे मारेकऱ्यांचे समर्थन नाही. त्यांनी जे काही केले त्यात शौर्य होते असे तर मुळीच म्हणायचे नाही. केवळ त्यांना 'भेकड' किंवा इतर कोणतीही विशेषणे लावणे हे फोल आहे एवढेच म्हणायचे आहे. ते भेकड आहेत अथवा नाहीत हा एक अत्यंत गौण प्रश्न आहे. त्यांना उपद्रवमूल्य आहे (उपद्रवमूल्य हा अत्यंत सौम्य शब्द झाला), त्यांनी आपल्यावर हल्ला केला आहे, जनतेची हत्या केली आहे, काळजी घेतली नाही तर पुन्हा करू शकतात हे महत्त्वाचे. आपण याबद्दल काही करू शकलो नाही आणि करू शकलो असतो का याला अर्थ नाही. हे होत राहणार आहे आणि ते टाळण्यासाठी यापुढे आपण काय करू शकतो आणि याला भविष्यात कसे तोंड देऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने याला इन्स्टंट उत्तरे नाहीत.
शूर अद्यापही आमनेसामने लढतात असाच माझा ग्रह आहे.
हे असे याप्रमाणे होत असते तर खरेच स्पृहणीय झाले असते पण दुर्दैवाने आता तसे होणे नाही; तशी अपेक्षा करणे फोल आहे. यापुढे हे असेच होत जायचे. त्याबद्दल काय करायचे हे महत्त्वाचे.
मुंबईला राजलक्ष्मी भोसल्यांसारख्या राजकारण्यांचा पाठिंबा ... मुंबईकरांचे हे स्पिरिट तेथेही दिसो.
जे काही घडले आहे तो केवळ मुंबईचा प्रश्न आहे असे वाटत नाही. तसे कोणी सूचित केले असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.
हा प्रश्न एकट्या मुंबईचा नाही. ७/११चे लोकलमधील स्फोट हाही एकट्या मुंबईचा प्रश्न नव्हता. केवळ भारताचाही नव्हता. ९/११ हा केवळ न्यूयॉर्कचा किंवा अमेरिकेचा प्रश्न नव्हता, लंडन किंवा माद्रिदमधील हल्ले हे केवळ लंडनचे/ब्रिटनचे किंवा माद्रिदचे/स्पेनचे प्रश्न नव्हते त्याप्रमाणेच. ही वेळ कोणावरही येऊ शकते.
त्यामुळे 'आमचा तुम्हाला पाठिंबा आहे' या विधानाला काहीही अर्थ नाही. ही क्लासिक कडेच्या पोहणाऱ्यांची मानसिकता आहे. 'अरेरे, तुमच्यावर ही वेळ आली, वाईट वाटले - बरे आहे आमच्याकडे हा प्रश्न नाही'सारखे काहीसे. 'तुमचा प्रश्न हा आमचाही प्रश्न आहे - उद्या आमच्यावरही हीच वेळ येऊ शकते' हे आज आपण सर्वांनीच लक्षात घेण्याची आणि त्या भूमिकेतून असे पुन्हा होणे टाळण्यासाठी - मुंबईत किंवा भारतातच नव्हे, तर कोठेही होणे टाळण्यासाठी - शक्य तितके coordinated प्रयत्न करून एकमेकांची मदत करण्याचे 'स्पिरिट' दाखवण्याची गरज आहे.