तुम्ही म्हणत आहात की 'या हल्ल्यासंबंधात हल्लेखोरांचे राजकीय उद्दिष्ट असेल ते काश्मीरशी संबंधित.' हे असू शकेलच.
आहेच.
परंतु दहशतवादाची जगतिक व्याप्ती बघता भारतात होणारे हल्ले हे त्या एका जागतिक दहशतवादी उद्दिष्टाशी निगडीत नसतील का?
आहे. त्याला मी दहशतवादी उद्दिष्ट्य मानत नाही. ते राजकीय उद्दिष्ट्य आहे. माझ्या पहिल्या लेखांकातील हे वाक्य -
"हे दहशतवादी ज्या भूमीला आपली मातृभूमी मानतात, त्यावरील परकीय ताबा संपवणे हा त्यांचा मूलभूत हेतू आहे (संदर्भ - डाईंग टु विन). आखाती-अरब राष्ट्रातील परिस्थितीचे त्यांनी जे विश्लेषण केले आहे, त्यानुसार ही मांडणी पटण्याजोगी आहे."
काश्मीर संदर्भात एक वेगळा, काश्मीर केंद्रित दहशतवादी 'अप्रोच' विविध संघटनांचा आहेच.
तुम्ही उल्लेख करीत असलेल्या या संघटना म्हणजे काश्मीरातील फुटिरवादी संघटना असे मानू. त्यापलीकडेही अनेक संघटना त्याच उद्दिष्ट्यासाठी युद्ध करीत आहेतच. लष्कर, जैश ही त्यापैकी काही उदाहरणे.
मग मुंबई हल्ल्यांमागचे प्रयोजन काय?
प्रयोजन साधे-सरळ. भारतात दहशत पसरवून जेरीस आणणे आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घेणे.
मला पडलेला अजून एक प्रश्न - मला असे वाटते की कुठलीही बंडखोर संघटना आपले हेतू स्पष्ट करत असते. जसे की नक्षलवादी सरंजामशाही शोषणाविरुद्ध बंड करतात, एलटीटीई वेगळया तमिळ स्टेटकरता युद्ध करते. परंतु ही मंडळी त्या विवक्षित भागात कार्यरत असतात. ज्या दहशतवादाबद्दल आपण बोलत आहोत तो असा विशिष्ट हेतू स्पष्ट का करीत नाही? (काश्मीरमध्ये करत असेल, पण इतर ठिकाणचे काय?)
त्यांनी ते केले आहे. लादेन असो वा जवाहिरी वा अफगाणिस्तान-इराकमधील अनेक अनामिक. त्या साऱ्यांनी आपल्या "मायभूमी"वरून विदेशी शक्ती परत जाव्यात ही मागणी लावून धरली आहे. पॅलेस्टीनचे स्वातंत्र्य हीही त्यांची मागणी आहे. ही उद्दिष्ट्ये राजकीयच आहेत.
मुंबईवरील हल्ला, भारताच्या विविध शहरांमधील बाँबस्फोट, अमेरिकेवरील हल्ला, ब्रिटनमधील बॉंबस्फोट या सगळयामागे राजकीय हेतू असलाच तर तो इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या धार्मिक हेतूने प्रभावित झालेला आहे असे तुम्हांला वाटते का? मला ही शक्यता खूप दाट आहे असे वाटते.
नाही. मूळ हेतू राजकीय आहे आणि त्याला धार्मिक रंग देऊन संघटन उभारणी केली जाते, असे माझे म्हणणे आहे. कारण सरसकट धर्मयुद्ध म्हणण्याजोगी स्थिती नाही. एकूण इस्लामी लोकसंख्या या युद्धात उतरलेली नाही. उलट या लोकसंख्येतील एक मोठा समूह असाही आहे की ज्याला युद्धाचा हा प्रकार मान्य नाही.
राजकीय रंग असलेले हे 'धर्मयुद्ध' आहे का?
मी उलट म्हणेन. धर्माचा रंग लावलेले हे राजकीय युद्ध आहे.