भारतापुरते बोलायचे झाले तर काश्मीरची मागणी मान्य झाली तर भारतातील दहशतवाद थांबेल का?

क्षणभर जरी गृहीत धरलं की स्वतंत्र काश्मीरची त्यांची मागणी मान्य  झाली तरी सुद्धा हा दहशतवाद नक्कीच थांबणार नाही.   कारण मुळात लष्कर ए तैबाची उद्दीष्टं यापेक्षा कितीतरी मोठी (आणि भयावह) आहेत.   काश्मिर हा त्या उद्दीष्टांचा फक्त एक भाग आहे.  विकीपीडीयावर  http://en.wikipedia.org/wiki/Lashkar-e-Toiba या दुव्यावर गेल्यास लष्करची संपूर्ण माहिती मिळते.   या माहितीप्रमाणे भारतीय प्रजासत्ताक आणि हिंदू आणि ज्यू धर्म यांचा संपूर्ण नायनाट हे लष्कर ए तैबाचं मुख्य उद्दीष्टं आहे.   कारण हिंदू आणि ज्यू धर्म हे इस्लाम धर्माचे शत्रू आहेत.   त्याबरोबरच लष्करला संपूर्ण दक्षिण आशिया, रशिया आणि शिवाय चीन मध्येही इस्लाम धर्माचंच राज्य उभं करायचंय.  

एका ठिकाणी मी असंही वाचलंय की न्यूयॉर्क, नवी दिल्ली आणि तेल अव्हिव या शहरांवर आपला झेंडा फडकावणं हे लष्करचं अंतिम उद्दिष्ट आहे.

ही उद्दीष्टं आणि त्यामागची ही कारणं बघितली तर साधारणपणे हल्ल्यासाठी मुंबईच आणि त्यातही ताज, ओबेरॉय का निवडलं गेलं असावं याचा अंदाज येतो. संपूर्ण भारतीय प्रजासत्ताकाचा नायनाट करण्याच्या यांच्या उद्दीष्टांआड येणारा मुख्य अडथळा म्हणजे भारताची आर्थिक प्रगती.   मागच्या पाच सहा वर्षातली भारताची वेगवान प्रगती आणि भविष्यातल्या प्रगतीबद्दलचे जगभरातल्या पंडितांचे आडाखे हे एक आणि संपूर्ण जगभर थैमान घालत असलेल्या आणि पाकिस्तानला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या आर्थिक मंदीचा भारतावर (तुलनात्मक दृष्ट्या) फारसा न पडलेला परिणाम हे दोन; या दोन्ही बाबी यांच्या दृष्टीनं फार मोठ्या चिंतेच्या ठरल्या असणार.  

कारण आर्थिक प्रगतीच्या बरोबरीनंच येणार सुरक्षा यंत्रणांमध्ये अद्ययावतता, आधुनिकता आणि विस्तार. तसंच जसा भारत आर्थिक महासत्ता बनत जाईल तसा त्याला मिळणारा आंतरराष्ट्रीय  पाठिंबाही वाढत जाईल  आणि हे सगळं म्हणजे लष्करच्या दृष्टीनं मोठीच डोकेदुखी ठरेल.  त्यामुळे  या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न या गटांकडून होणार हे उघड आहे.   मुंबई, ताज, ओबेरॉय यांना लक्ष्य करण्यामागे हीच विचारधारा असेल असे वाटते.  

अवांतर : लष्कर ए तैबा उघडपणे ज्या नावानं काम करते (अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्ताननं या संघटनेवर बंदी घातल्यानंतर) त्या जामात-उद-दावा नावाच्या संघटनेच्या संकेतस्थळावर (दुवा क्र. १ )गेलं की भारताबद्दलचा खोटा प्रचार हे लोक कसा करतात हे चांगलं कळतं.   काही काही ठिकाणी तर यांचा खोटारडेपणान एवढा बळावलाय की त्यानं चांगलीच करमणूक होते!