क्षणभर जरी गृहीत धरलं की स्वतंत्र काश्मीरची त्यांची मागणी मान्य झाली तरी सुद्धा हा दहशतवाद नक्कीच थांबणार नाही.
माझ्या वरच्याच प्रतिसादात मी हे मान्यच केलं आहे की, दहशतवाद पूर्ण थांबेल, अशी केवळ शक्यता आहे. कारण ती एक प्रक्रिया आहे.
कारण मुळात लष्कर ए तैबाची उद्दीष्टं यापेक्षा कितीतरी मोठी (आणि भयावह) आहेत. काश्मिर हा त्या उद्दीष्टांचा फक्त एक भाग आहे.
हो. ही उद्दिष्ट्यांची मांडणी मी वाचली आहे. पण ती किती अवास्तव आहे हे त्यांच्या नेत्यांनाही ठाऊक असणार नाही असे नाही. अशी मांडणी अनुयायी मिळवण्यासाठी केली जाते हे काही नवीन नाही. त्याचे दाखले येथे अगदी जवळच खूप आहेत. अशा स्वरूपाची मांडणी केल्याशिवाय अनुयायी मिळत नसतात. त्यांना त्या उद्दिष्ट्यांची नशा देता येत नाही. ती देता आली नाही तर लढा उभा रहात नाही आणि त्यामागील आपली उद्दिष्ट्ये पूर्ण करणे शक्य होत नाही.
या माहितीप्रमाणे भारतीय प्रजासत्ताक आणि हिंदू आणि ज्यू धर्म यांचा संपूर्ण नायनाट हे लष्कर ए तैबाचं मुख्य उद्दीष्टं आहे. कारण हिंदू आणि ज्यू धर्म हे इस्लाम धर्माचे शत्रू आहेत. त्याबरोबरच लष्करला संपूर्ण दक्षिण आशिया, रशिया आणि शिवाय चीन मध्येही इस्लाम धर्माचंच राज्य उभं करायचंय.
हो. हेही उद्दिष्ट्य तेथे मांडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याची अवास्तवता त्यांना ठाऊक असणार आहे हेही नक्की.
एका ठिकाणी मी असंही वाचलंय की न्यूयॉर्क, नवी दिल्ली आणि तेल अव्हिव या शहरांवर आपला झेंडा फडकावणं हे लष्करचं अंतिम उद्दिष्ट आहे.
अगदी. हेही उद्दिष्ट्य त्यांनी मांडून ठेवलं आहे.
ही उद्दीष्टं आणि त्यामागची ही कारणं बघितली तर साधारणपणे हल्ल्यासाठी मुंबईच आणि त्यातही ताज, ओबेरॉय का निवडलं गेलं असावं याचा अंदाज येतो.
लक्ष्य निर्धारणाच्या प्रक्रियेत लावण्यात लावण्यात आलेल्या मापदंडांपैकी हा एक मापदंड आहेच. तो तसा नसेल तर त्यांच्या एकूण "संघर्षा"लाच फुटकळ कारवायांचे परिमाण प्राप्त होऊन ते कधीचेच नामशेष होतील.
संपूर्ण भारतीय प्रजासत्ताकाचा नायनाट करण्याच्या यांच्या उद्दीष्टांआड येणारा मुख्य अडथळा म्हणजे भारताची आर्थिक प्रगती.
मुख्य अडथळा पटतो. पण त्यांचे मूळ उद्दिष्ट्य हेच मुळात अवास्तव, कल्पनारंजक आहे. त्याची जाणीव त्यांनाही असणार आहे. राजकीय देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत एक मोठे विशाल उद्दिष्ट्य ठेवून जाण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे इतकेच.
कारण आर्थिक प्रगतीच्या बरोबरीनंच येणार सुरक्षा यंत्रणांमध्ये अद्ययावतता, आधुनिकता आणि विस्तार. तसंच जसा भारत आर्थिक महासत्ता बनत जाईल तसा त्याला मिळणारा आंतरराष्ट्रीय पाठिंबाही वाढत जाईल आणि हे सगळं म्हणजे लष्करच्या दृष्टीनं मोठीच डोकेदुखी ठरेल. त्यामुळे या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न या गटांकडून होणार हे उघड आहे. मुंबई, ताज, ओबेरॉय यांना लक्ष्य करण्यामागे हीच विचारधारा असेल असे वाटते.
ही प्रक्रिया एकूण समजून घेतली तर, त्यांच्या राजकीय उद्दिष्ट्यांच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्या "लढ्या"त एक लक्ष्य असणारच आहे.
अवांतर : लष्कर ए तैबा उघडपणे ज्या नावानं काम करते (अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्ताननं या संघटनेवर बंदी घातल्यानंतर) त्या जामात-उद-दावा नावाच्या संघटनेच्या संकेतस्थळावर (दुवा क्र.१) गेलं की भारताबद्दलचा खोटा प्रचार हे लोक कसा करतात हे चांगलं कळतं. काही काही ठिकाणी तर यांचा खोटारडेपणान एवढा बळावलाय की त्यानं चांगलीच करमणूक होते!
हा प्रचार त्या तंत्राचाच एक भाग आहे. तो प्रचारच संघटन पुढे नेत असतो. त्यामुळं त्यांचा प्रचार खोडण्याचं काम करावंच लागतं आणि ते केवळ लष्करी डावपेचातून होत नसतं, तर त्यासाठी राजकीय उद्दिष्ट्यही हाताळावं लागतं आणि त्यासाठी इकडच्या पक्षालाही एक राजकीय उद्दिष्ट्य ठेवावं लागेल, असं माझं मत आहे.
तुम्हाला विनंती आहे की, अजून असे मुद्दे जरूर उपस्थित करा. काही ठिकाणी मलादेखील माझे विचार दुरूस्त करून घेता येतील.