तुम्ही अगदी पुणेकरांच्या वर्मी घाव घातलाय राव!

एक मस्त घटना सांगते. खरं तर ती लाजिरवाणी आहे पण अति झालं आणि हसू आलं अशा प्रकारची असल्याने मस्त म्हणतेय.

मी एकदा पीएमटीने प्रवास करत होते. इथे सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलापाशी एक सिग्नल आहे. तो ओलांडून पुढे गेल्यावर बस थांबा आहे. मला या बस थांब्यावर उतरायचं होतं म्हणून मी दाराशी येऊन उभी राहिले चालकाशेजारी. तेवढ्यात सिग्नल लाल झाला त्याला न जुमानता चालकाने गाडी पुढे दामटली. मी त्याला म्हटलं, "अहो काका जरा सिग्नल बिग्नल बघा की!" तर शांतपणे माझ्याकडे वळून तो म्हणाला, "का हो मॅडम तुम्हाला पुलापाशी उतरायचं होतं का?" आता याला काय म्हणायचं?

म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणं इतकं हाडीमाशी भिनलंय इथे की खरंच अति झालं आणि हसू आलं अशी परिस्थिती होते.

आजच सकाळी मी कार्यालयात येत होते तर चौकात सिग्नल मोडून निघालेली एक बाई समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना सपशेल पडली आणि तिचा डावा हात मोडला. आणि ट्रॅफिक पोलीस उभी होती तिलाच मदतीला धावावं लागलं. पुन्हा वाहतुकीचा खोळंबा झाला तो वेगळाच. कारण तिची गाडी रस्त्यात तशीच पडून होती. मग मीच जाऊन ती गाडी उचलली. तिला किल्ली दिली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अगदी जवळच होतं म्हणून तिला कोणीतरी तिथे घेऊन निघाल्यावर मग वाहतूक सुरू झाली.

एकदा माझ्या ओळखीच्या एका बाईंच्या दुचाकीला पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकात एका सुमोवाल्याने धडक दिली. दुचाकीचे मागचे दिवे फुटले, मडगार्ड तुटले. त्या चौकात समोरच पोलीस चौकी आहे. तिथून हे दृश्य पाहून एक अधिकारी आला. त्याने सुमोवाल्याला दमात घेतलं, का रे दिसत नाही का? कुठे बघत गाडी चालवतो वगैरे.... तर त्याने उत्तर दिलं अहो नीटच चाललो होतो. पण या बाई मध्येच थांबल्या..... या बाई म्हणाल्या, "साहेब, सिग्नल बघा, अजूनही लालच आहे!"

तर ही अशी पुणेकरांची मग्रूरी वाहतुकीबद्दल! आता काय बोलायचं आणि आणि कसचं काय? स्वतःपासून सुरू करायचा प्रयत्न सुरू केलेलाच आहे. शिवाय जेव्हा जेव्हा समोर येईल तेव्हा तेव्हा दुसऱ्याला जाणीव द्यायचाही प्रयत्न चालू आहे.