आज माझ्या मुलाच्या मराठी माध्यमाच्या शालेच्या ५वीच्या प्रवेशासाठी गेलो होतो. पुर्वी शाळेत हाय्यर इंग्लिश ( विज्ञान आणि गणित इंग्रजी मध्ये ) किंवा लोअर इंग्लिश ( फक्त इंग्रजी ) असा पर्याय असे. आज समजले की या वर्षापासुन मराठी माध्यमात मराठी सोडुन सर्वच विषय इंग्रजी मध्ये राहणार आहेत. म्हणजे मागच्या दारातुन शाळैय माध्यमांचे पुर्णपणे इंग्रजीकरण होणार असे दिसत आहे. त्याचबरोबर काही विचार मनात आले.
इंग्रजी ही जागतिक भाषा आहे हे मान्य केले तरी प्रत्येक मराठी मुलगा बौध्द्दिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर इंग्रजी शिकु शकणार नाही, पर्यायाने किंवा पुढे १० वी मध्ये अश्या माध्यमांचा निकाल ३० % वर जाणार नाही. ( तात्यासाहेब शिरवाडकर ३० वर्षापुर्वी यांनी एका लेखात असे लिहिले होते कि, " १०/११ च्या शालांत परीक्षेचा निकाल लागण्याच्या पहिल्या दिवशी मी शांत पणे झोपु शकत नाही. प्रत्येक वर्षी अंदाजे ५० % मुले नापास होतात. त्यातील बहुतांशी मुले इंग्रजी विषयात गटांगळी खातात. अश्या मुलांचे पुढे काय होत असेल किंवा होते या विचारानेच मी धास्ती खातो.") माझ्याही मनात हाच विचार आला की, मराठी माध्यमाच्या मुलांचे काय होणार? अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठी. कोणताच पीळ राहत नाही. बरे पालक सुध्दा अश्या स्थितीत काय करणार? म्हणजे धक्कागाडी १० वी पर्यंत जाणार आणि पुढे काय?

बहुतेक पुढच्या पिढीत महाराष्ट्राला मजुरांसाठी इतरांवर अवलंबुन राहावे लागणार नाही. महाराष्ट्र देशा, मजुराच्या देशा अशी कविता येईल कदाचित....