लंघन किंवा संयमित / संतुलित आहाराचे पहिले काही तास फारच छान असतात. आसपासच्या भजी, मिसळ वगैरे खाणाऱ्यांबद्दल तुच्छता आणि स्वतःबद्दल विलक्षण अभिमान अशी मनाची अवस्था असते.
प्रत्येक माणसाची जशी एक किंमत असते तसेच प्रत्येक लंघनाची एक मर्यादा असते. लंघनाचा काळ वाढू लागला की पोटात खड्डा पडणे, सतत खाण्याविषयीचे विचार मनात येणे असे सगळे सैरभैर होते. 'कधी तरी जायचेच आहे, जितके दिवस आहोत, तितके दिवस मस्त खाऊनपिऊन जगू' या विचाराचे स्फटिकीकरण झाले की ताटात भरल्या वांग्याची चमचमीत भाजी, चांगल्या दोन अडीच भाकरी, गोळाभर मुगाची उसळ, लसणीची चटणी आणि पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर असे वाढून घेतले जाते. झोपाळ्यावर बसून भुईला पायाने रेटा देत मोठमोठे घास खाताखाता 'मिलके बिछड गयी अखियां' असे गुणगुणताना लंघन, उपास असले सगळे मनातून दूर फेकले जाते!