मराठी लोकांना हिंदी-इंग्रजीच काय पण मराठीसुद्धा धड येत नाही, हे १०० टक्के सत्य आहे. शाळेसाठी ज्या शिक्षकांची निवड होते त्यांना त्यांची मातृबोली बोलता येते, पण प्रमाण मराठी बोलता-लिहिता येते की नाही याची चाचणीसुद्धा घेतली जात नाही. हा फरक हिंदी मुलखात गेले की जाणवतो. भोजपुरी, पहाडी किंवा अन्य कोणतीही बोली बोलणारा माणूस हिंदी उत्तम लिहितो. डेहराडूनला असताना दोन शेतकरी स्त्रिया आपाआपसात त्यांच्या बोलीत बोलत होत्या. त्यांना मी रस्ता विचारला. त्यांनी शुद्ध हिंदीत बोलून मला आश्चर्यचकित केले.
याला एकच उपाय! भाषेचे उत्कृष्ट ज्ञान असल्याशिवाय शिक्षकाची नेमणूक करू नये. किंवा केल्यास तीन महिन्यात त्यांना जी भाषा किंवा ज्या भाषेतून शिकवायचे आहे त्या भाषेची एक परीक्षा द्यायला लावून, ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यास मगच पुढे नोकरीत ठेवावे. याला विज्ञान-इतिहास-भूगोल शिकवणारे शिक्षकसुद्धा अपवाद नसावेत. (चित्रकला, गायन, शारीरिक शिक्षण इत्यादी शिकवणाऱ्या शिक्षकांना वग़ळायला हरकत नाही.) जिथे आडातच नाही, तिथे पोहऱ्यात कुठून येणार? फक्त कोंकण आणि विदर्भातून आलेले मराठी नेते बऱ्यापैकी मराठी बोलतात.
दूरदर्शनवरच्या सर्व मराठी कार्यक्रमात निवेदकाकडून बोलल्या जाणाऱ्या व तळाशी लिहिल्या जाणाऱ्या मराठीत अनेक चुका आढळतात.