खरं तर मराठी माणसाला हिंदीच काय मराठी, तमिळ, बोडो, टागालोग, हौसा, कुर्दी, किशुआ याही भाषा चांगल्या यायला हव्यात असे माझे मत आहे. तसे झाले तर आपल्या समाजाची प्रतिमा जगात उजळेल; जगावर आपला ठसा उमटेल. पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर खानदेश-विदर्भ-मराठवाडा-कोकणातल्या सर्वसामान्य मराठी लोकांनाही या भाषा येत नाहीत/जेवढ्या माहीत आहेत त्यादेखील कच्च्या आहेत! त्यामुळे आपल्या समाजाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला बाध येतो; जगात दाखवायला आपल्याला तोंड उरत नाही. याबाबत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात हिंदीसह तमिळ, बोडो, टागालोग, हौसा, कुर्दी, किशुआ या व अश्या इतर भाषांनाही महाराष्ट्रभाषेचा दर्जा देऊन त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत अनिवार्य केले पाहिजे. या परभाषांना आपण परके न मानता आपलेच मानावे, त्यामुळे ज्ञानेश्वरांचे पसायदान आपण साकारू शकू असे माझे मत आहे.