पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमात मीही सहभागी झालो होतो. समिक्षक म्हणूनही काम केले आहे. या अभ्यासासाठी सज्जनगड मासिकाचे वर्गणीदार असणे सोईचे पडते. कारण त्यात दर महिन्याच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित काही मार्गदर्शन तसेच दासबोधाशी संबंधित इतर माहितीही असते. समिक्षकांच्या शिवथर येथील मेळाव्यात मात्र मला सहभागी होता आले नाही. एक चांगला उपक्रम म्हणून तो पूर्ण करायला हरकत नाही. शेवटच्या प्रश्नपत्रिकेतील व्यक्तिगत प्रगतीचा शोध घेण्याच्या दृष्टीने तयार केलेले प्रश्न मला विशेष आवडायचे.
मी विद्यार्थी (अभ्यासक) असताना शिरपूर (धुळे) येथील श्री. श्रीकृष्ण जोशी हे माझे समिक्षक होते. मी समिक्षक असताना माझ्याकडे दिलेल्या १० विद्यार्थ्यांपैकी केवळ २ जणांनीच हा उपक्रम पूर्ण केला. मला हे माझे अपयश वाटते, पण या उपक्रमात सहभागी झालेल्यांच्या गळतीचे प्रमाणही मोठे असावे. रोज केवळ १५ मिनिटे देऊनही हा उपक्रम पूर्ण करता येतो, हा माझा अनुभव आहे.