आल्डो लिओपोल्ड... दहा वर्षांपूर्वीची एक आठवण जागी केलीत. अ सँड काऊंटी अल्मानाक हे त्यांचं पुस्तक. त्यातला 'द लँण्ड एथिक' हा एक निबंध. आवर्जून वाचावं असं पुस्तक. अर्थातच, तुम्ही वाचलं असेल. पण लिओपोल्डच्या निमित्तानं इतर काही आठवणी जाग्या झाल्या. अर्न नेस (उच्चार नेमका ठाऊक नाही) यांचे डीप इकॉलॉजीवरचे विचार वाचल्याचेही आठवले. पर्यावरण रक्षणासाठी अगदी स्थूल स्वरूपात आठ तत्वांशी बांधिलकी मानणे अशी काहीशी मांडणी नेस यांनी केल्याचं आठवतंय.
लिओपोल्ड स्वतः शिकारी, तरी नंतर इकॉलॉजिस्ट. हा विरोधाभास कसा, असा प्रश्नही त्यांच्या या पुस्तकाच्या निमित्तानं अनेकांनी उपस्थित केला होता. त्याच्या या एका वाक्यात सारं सार यावं -
"अ थिंग इज राईट व्हेन इट टेंड्स टू प्रिझर्व्ह द इंटेग्रिटी, स्टॅबिलिटी, अँड ब्यूटी ऑफ द बायोटिक कम्युनिटी. इट इज रॉंग व्हेन इट टेंड्स अदरवाईज"
येथे त्यांनी बायोटिक कम्युनिटी असा शब्दप्रयोग किती विचाराने केला असेल?
लँड एथिकमध्ये लिओपोल्ड यांनी जसं जमिनीच्या कमोडीफिकेशनविषयी लिहिलं आहे तशाच स्वरूपाचं काही लेखन 'गया' अशी संकल्पना घेऊन झाल्याचं आठवतंय. गया म्हणजेच पृथ्वी. पृथ्वीला एक जीव कल्पून केलेली काही मांडणी त्यात आहे.
एन्व्हायर्नमेंटल एथिक्स या प्रांतात हे सारं लेखन मोडतं. त्यात प्राणी हक्क, प्राणी कल्याण, मनुष्यकेंद्रितता, स्त्रीवाद वगैरे वेगवेगळे प्रवाह आहेत. हे सगळे विषय तसे जड, पण अगदी साध्या भाषेतही मांडण्यात आले आहेत.
सगळ्या आठवणी एका लिओपोल्डच्या उल्लेखानं जाग्या झाल्या.
या संदर्भात आणखी एका लेखाची आठवण होते. तो म्हणजे लिन व्हाईट यांचा लेख. द हिस्टॉरिकल रूट्स ऑफ अवर इकॉलॉजिकल क्रायसीस. ख्रिश्चन धर्मविचार घेऊन केलेले एक मंथन. सारेच पटावे असे नाही, पण सहजी नाकारण्याजोगेही नाही.
पुढच्या पिढ्या वगैरेंचा विचार त्या विमर्षात खूप झालेला दिसतो. अलीकडे त्या प्रांतात काही वाचन झाले नाही. तुमचे झाले असावे. असेल तर नवे संदर्भ जरूर द्या. आवडेल.
तुमच्या या लेखाच्या अनुषंगाने आलेल्या अनेक मुद्यांचा संबंध या साऱ्या मंडळींच्या लेखनात जाऊन पोचतो.
तुम्ही लेखाला शेकोटी असे शीर्षक दिलंय. शेकोटी कसली, माझ्या मते ही तर शेगडीच होत चालली आहे. शेकोटीतून दिलासा असतो, थंडीतील उबेचा. शेगडीत केवळ होरपळ.
चांगला आटोपशीर लेख, आधारित असला तरीही स्वतःची एक झाक दाखवणारा.
एकच छोटी गडबड वाटते. लिओपोल्ड यांचे हे लेखन १९६० च्या आधीचे आहे.