एकदा महाविद्यालयात असताना (सब्मिशनची तारीख जवळ आली असताना) एका मित्राचे जर्नल घेऊन मी पनवेलहून गोरेगावाला जात होतो. नेहमीप्रमाणे पनवेल ते टिळकनगर झोप काढली आणि कुर्ल्याला उतरून दादरला जाण्यासाठी मेन लाइनवरची गाडी पकडली. माटुंग्यापर्यंत पोचताना लक्षात आलं की माझं आणि मित्राचं (पूर्ण झालेलं) जर्नल असलेली पिशवी न घेताच कुर्ल्याला उतरलोय आपण. झालं! आता मेलो आपण असं वाटलं. माझं एकट्याचंच जर्नल हरवलं असतं तरी ठीक होतं. रात्र-रात्र जागून पूर्ण केलंही असतं. पण मित्राचं जर्नल पण आपण विसरलोय म्हटल्यावर माझी चांगलीच तंतरली...
तेवढ्यात एक गोष्ट लक्षात आली की हार्बर आणि मेन लायनींना सीएसटीशिवाय, मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड ही दोन स्टेशनं समान आहेत. खांद्यावरच्या दप्तरातून वेळापत्रक काढलं आणि पनवेलची गाडी सीएसटीला कधी पोचते ते पाहिलं. त्यानंतर पाचच मिनिटांनी सीएसटीहून अंधेरी गाडी सुटणार होती. तेव्हा आपलीच गाडी अंधेरीसाठी सुटेल असा कयास बांधला. मग ज्या गाडीने दादरला चाललेलो ती सँडहर्स्ट रोडला कधी पोचते ते पाहिलं. माझ्या नशिबाने ती जलद असल्याने अंधेरीच्या २ मिनिटं आधी पोचत होती. तसाच (तिकिटाशिवाय) दादरला न उतरता सँडहर्स्ट रोडला गेलो. तिथे मेन लायनीचं स्थानक खाली आणि हार्बरचं वरती आहे. पळत वर गेलो. अंधेरी गाडी अजून यायची होती. रोजच्या प्रवासामुळे डबा ठरलेला होता. तो जिथे येतो तिथे गेलो, अंधेरी गाडी आली, आत शिरलो आणि माझी पिशवी सापडली. त्याच गाडीने अंधेरीपर्यंत गेलो आणि गाडी बदलून पुढे गोरेगावाला...