"मराठी विशेषनामे इंग्रजीत लिहल्यानंतर ती वाचाताना अ-मराठी माणसे खूपच चूका करून ठेवतात." श्रीकांत जोशी, आपल्या ह्या भावना व्यक्त करणं इतपत ठिक वाटलं. परंतु त्यानंतर - "त्यावर मी काही उपाय सुचवतो." हे काही रुचलं नाही. चूका कोण करतं, आणि 'ऍडज्स्टमेंट' कोणी करायची?
'ती, अमराठी मंडळी चूका करतात (असे आपणा सर्वांना वाटते) म्हणून आपल्यात आपण बदल करून घेवूया' हा त्या भावनेमागचा विचार खेदजनक व निंदेस पात्र आहे.
तुम्ही कसेही लिहा, अमराठी मंडळी ते त्यांच्या वर्णांच्या (अक्षरचिन्हांच्या) ओळखीच्या तंत्रानुसारच त्यांचा उच्चार करणार. कारण त्यांची ह्या विशयाबाबतची 'जडण-घडण' वेगळीच असणार. 'वालावलकर' चे 'वलवलकर' च होणार. ह्या गोष्टीचे इतकं 'बाऊ' कशासाठी? त्याही पुढे जावून तुम्ही (व तुमच्या आधी गांगल फॉंट चा शोध लावणारे काही) 'बाऊ'चा 'भुआ' त रुपांतर का करताय?
'द', 'छ', 'ह', 'र' ह्या सारख्या काही वर्णांना (अक्षरचिन्हांना) 'अ' ह्या स्वराची दांडी इतर वर्णांना आहे त्याप्रमाणे नाही हि सध्याच्या 'बाळबोध (देवनागरी) लिपी तील त्रुटी आहे. संगणकाच्या गणीती पद्धतीमुळे हि बाब नकळत सगळ्यांच्या लक्षात येवू लागली आहे.
"मराठी विशेषनामे इंग्रजीत लिहल्यानंतर ती वाचाताना अ-मराठी माणसे खूपच चूका करून ठेवतात. " - तुम्ही जी ही भावना व्यक्त केली त्यावर त्याच वेळेचा उपाय असा असू शकतो.:-
ज्या क्षणी अमराठी माणूस चूकिच्या पद्धतीने नावाचा उच्चार करतो/करते तेव्हा त्याच वेळी आपण ही त्यांच्याशी चूकिच्या पद्धतीने उच्चार करावेत. असे केल्याने एका अर्थाने 'सूड घेतल्याचे' समाधान ही मिळेल. व जर ती बाब न दुखवणारी झाली तर त्या व्यक्तिशी 'थट्टामस्करी' होण्याने वातावरण ही खेळकर होईल. पण असं केलं नाहीतर ती नकारात्मक ऊर्जा मनात दबून राहीली तर स्वतःमध्ये बदल नव्हे 'ऍडजेस्टमेंट' घडवण्यास कारणीभूत होणार.
आतापर्यंत मराठी माणसांनी बरीच 'ऍडजेस्टमेंट' केली. आता खूप झालं! अमराठी मंडळींना देखील 'ऍडजेस्टमेंट' साठी तयार व्ह्यायला हवे. नव्हे ते 'थट्टामस्करीतून' आपणच त्यांना शिकवायला हवे.
लिपी हे प्रत्येक भाषक समाजाचे प्रतिबिंब असते. सध्याच्या बाळबोध लिपी बद्दल म्हणायचे झाले तर ते बदल होणे गरजेचे आहे. (रोमन लिपीतून वेगळ्या पद्धतीने लिहीणं/ टंकणं हा उपाय योग्य नाही. ) 'बदला' मागचा हेतू मराठी समाजाच्या बदललेल्या मानसिकतेला, व्यापक होत असलेल्या दृष्टीकोनाला पूरक म्हणूनच व्हावयास हवे. मराठी माणसाच्या स्पष्ट आकलन शक्तीचे प्रतिबिंब सध्याच्या लिपीतून होत नाही आहे हे सत्य आहे.