मराठी काय की इंग्रजी काय, कुठल्याही लिपीत मर्यादित अक्षरे आणि मर्यादित उच्चार असतात. ते फक्त त्या त्या भाषेतील शब्द लिहिण्यासच पुरेसे असतात. मराठीतलाच नव्हे तर दुसऱ्या कुठल्याही लिपीतला किंवा भाषेतला (फ्रेंच-जर्मन सकट)मजकूर इंग्रजीच्या रोमन लिपीत जसाच्यातसा लिहिता येणार नाही. फार काय, देवनागरीत लिहिलेले मराठी नाव-आडनाव हिंदीभाषक बरोबर उच्चारीलच असे नाही. (उदा. चोचे, झोडगे, ज्ञानेश्वर, जोगळेकर इ.) तोच प्रकार मराठीचा. हिंदीतले उच्चार-- इंदिराचा इंद्रा, भावनाचा भाव्ना, ममताचा मम्ता, लक्ष्मणचा लछ्मन, असे होतात. असली नावे हिंदीच्या लकबी न जाणणारा मराठी माणूस चुकीचीच उच्चारणार. आपण साधी हिंदी नावे नीट लिहू/उच्चारू शकत नाही तर, रोमन लिपीत लिहिलेली मराठी विशेषनामे, मराठी भाषक सोडून दुसरा कोणीही योग्यरीत्या वाचू शकेल याची काय खातरी? अशा परिस्थितीत फक्त इंटरनॅशनल फोनेटिक लिपीत मराठी विशेषनामे लिहिली, तरच ती लिपी जाणणारा दुसरा, ती नामे योग्य रितीने वाचेल. पण अशी लिपी जाणणारे मराठीजन किती?
एवंच काय, विशेषनावांचे विकृतीकरण होणारच. ते सहन करणे किंवा, दुसऱ्याला उच्चार नीट समजावून देणे एवढेच आपल्या हाती!.