स्वामीयोगेश यांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. इंग्रजांना विनाकारण दोष देऊ नये. त्यांना भारतीय उच्चार जसे ऐकायला आले तसे त्यांनी ते त्यांच्या सव्वीस मुळाक्षरांत लिपिबद्ध केले. इंग्रजीत आ-कारान्त शब्द नाहीत. ते आपण करतो त्या 'इंडिया' शब्दाचा उच्चार ते 'इन्डिअ' करतात. त्यामुळे इंग्रज, 'गुप्त'चे गुप्ता करणे शक्य नाही. मराठी भाषक आणि महाराष्ट्राच्या जवळपासच्या प्रदेशांतील लोक सोडले तर तमाम उत्तरी आणि दक्षिणी भारतीयांना कखगघ म्हणता येत नाही. ते काखागाघा असेच म्हणतात. अभिनेता अमिताभ बच्चनसुद्धा याला अपवाद नाही, हे त्याच्या दूरदर्शनवर पाहिलेल्या एका मुलाखतीवरून दिसून आले. मराठीतला सारेगमप कार्यक्रम हिंदीत सारेगामापा होतो. GUPT चा उच्चार गप्त होतो हे सांगायची गरज नाही. त्यामुळे इंग्रजांनी ऐकलेला गुप्तऽ हा उच्चार, रोमनमध्ये बरोब्बर लिहिला. इंग्रजांनी मराठी नांवा-गांवांची स्पेलिंगे इतकी योग्य केली होती की ती बदलण्याची आजतागायत आवश्यकता पडलेली नाही. ( Vasant, Wakde, Deo, Oke इत्यादी.)
हिंदुस्थानात नव्याने आलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याला आपल्या चौकीदाराशी हिंदी बोलण्याचा प्रसंग दिवसातून दोनदाच येई, एकदा दरवाजा उघड म्हणून सांगायला आणि एकदा बंद करण्यापूर्वी. हे हिंदीत कसे सांगायचे ते त्याने आपल्या साहाय्यकाला विचारले. त्याने दोन वाक्ये सांगितली, 'देअर् वॉज़् अ ख़ोल्ड्(कोल्डचा अस्सल इंग्रजी उच्चार!) डे' आणि 'देअर् वॉज़् अ ब्राउन् क्रो'. आणि ही वाक्ये ऐकून, दारवान दरवाजा उघड आणि बंद कसा करतो ते त्या अधिकाऱ्याला आयुष्यभर समजले नाही, अशी हकीकत आहे.
इंग्रजांना संस्कृत मराठी लोकांनी शिकवले हा भ्रम आहे. त्यांना शिकवणारे काशी-गया येथे असंख्य ब्राह्मण होते. आजही अमेरिका किंवा जर्मनी या देशांत संस्कृतचा जेवढा अभ्यास होतो, तेवढा महाराष्ट्रात होत नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील संस्कृत पुस्तकांची यादी संकेतस्थळावर आहे. तितकी पुस्तके पुणे विद्यापीठात नाहीत. हिंदू तत्त्वज्ञानविषक पुस्तकाची एक छोटीशी यादी दुवा क्र. १ इथे पाहा.
अहम् आणि सः हे दोनही शब्द मूलतः वेगळे आहेत. मराठी लोकांना इंग्रजांच्या सोयीसाठी सः चे अहम् केले हा निव्वळ जावईशोध आहे.