वांद्रे-कुर्ले संकुलातील एका मनोरंजनाच्या कार्यक्रमात सर्वचजण इंग्रजीत बोलले. सचिन तेंडुलकरने  बोलताना प्रत्येक वेळी मुंबईचा उच्चार मुंबाय असा केला. तसा त्याने करायला नको होता यात काहीच वाद नाही. पण आपण जे मुंबईचे स्पेलिंग केले आहे, त्याचा उच्चार बीबीसीवर करतात तसा 'मंबाय' आणि मंबाय'च होतो, ह्याचा विचार बॉम्बेचे स्पेलिंग बदलताना का केला नाही?  MUM चा उच्चार कुठलाही अमराठी माणूस 'मम्‌'च करणार.  आपण बॉम्बे ह्या रोमन लिपीतील शब्दाचा उच्चार 'मुंबई' करू शकलो असतो. इंग्रजीत कुठल्या स्पेलिंगचा काय उच्चार करायचा याचा विधिनिषेध ठेवला नाही तरी चालतो.  चिनी लोकांनी पेकिंगचे स्पेलिंग बीजिंग दिसेल असे केले असले तरी मूळ पीकिंग हा उच्चार बदललेला नाही.