महेश, कुशाग्र आणि शुद्ध मराठी यांनी छान माहिती आणि अंदाज व्यक्त केलेले आहेत. त्यात थोडीशी भर घालू इच्छिते.

संस्कृतात वत् आणि मत् असे दोन तद्धित प्रत्यय आहेत. ते कोणत्याही नामाला लागतात. ते स्वामित्वदर्शक आहेत. म्हणजे बुद्धिमान् या संस्कृत शब्दाचा अर्थ बुद्धीचा स्वामी असलेला म्हणजेच ज्याच्याजवळ बुद्धी आहे असा माणूस. त्याचप्रमाणे गुणवान् म्हणजे ज्याच्याजवळ गुण आहेत असा गुणी माणूस.

महेश यांनी म्हटल्याप्रमाणे असे शब्द श्रीमत् वा भगवत् या शब्दांप्रमाणे चालतात. त्यांची प्रथमेची रूपे पुढीलप्रमाणेः

श्रीमान् श्रीमन्तौ श्रीमन्तः / भगवान् भगवन्तौ भगवन्तः .

यापैकी श्रीमन्तौ आणि भगवन्तौ ही रूपे द्विर्वचनाची आहेत. मराठीत द्विवचन नसल्याने त्यांचा वापर होत नाही. मराठीत एकवचन आणि बहुवचनाचा (मराठीचे अनेकवचन)वापर मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.

हे शब्द वापरताना एकवचनात वान- मान (मराठीत पाय मोडत नाहीत.) आणि आदरार्थी करण्याच्या हेतूने अनेकवचन वापरताना वंत - मंत अशी रीत सुरवातीला निर्माण झाली असावी. पुढे हा फरक नाहीसा होऊन दोन्ही रूपे एकाच अर्थाने वापरली जाऊ लागली असावीत असे महेशप्रमाणे मलाही वाटते. भाषेच्या सुलभीकरणाच्या / सुलभीभवनाच्या ओघात असे बदल यादृच्छिक रीत्या (Randomly) घडत असतात.

हे दोन्ही प्रत्यय सारख्याच अर्थाचे आहेत. त्यांत कोणताही तरतमभाव नाही. आणि अर्थदृष्ट्या जराही फरक नाही.

म, अ किंवा आ शेवटी किंवा उपांती असल्यास मत् चे वत होते. कचटतप या वर्गातल्या पहिल्या चार अक्षऱांपुढे मत आल्यास त्याचे वत होते. असे असले तरी, या नियमाला अनेक अपवाद आहेत. शुद्ध मराठी यांनी दिलेली ही माहिती संस्कृतातील शब्दरचनेसाठी उपयुक्त आहे. मात्र मराठीत अशा प्रकारचा नियम लागू होत नाही. मराठीत यासंदर्भातील संकेत हे पूर्णपणे यादृच्छिक आहेत.

आपल्या प्रश्न क्र. ४ मध्ये शक्तिमान व वर्धमान यांसारख्या शब्दांची आपण तुलना केली आहे. त्यासंबंधी थोडे सांगते. वर्धमान सारख्या शब्दांमध्ये जो "मान" (येथे न चा पाय मोडलेला असणे अपेक्षित नाही.) प्रत्यय दिसतो तो वेगळा प्रत्यय आहे. हा कृदंत प्रत्यय आहे. तो थेट आत्मनेपदी धातूला (क्रियावाचक मूळ शब्दाला) लागतो. त्याचा अर्थ "वर्तमानकाळ" असा आहे. याप्रमाणे वर्धमान या शब्दाचा अर्थ वाढत असलेला / वाढणारा असा होतो. याचप्रमाणे याचमान म्हणजे याचना करीत असलेला, प्रकाशमान म्हणजे चमकत असलेला असे शब्द वापरले जातात. या पद्धतीने तयार होणाऱ्या शब्दांचा वापर मराठीत तसा कमी आहे.

नाशिवंत हा शब्द पूर्णपणे मराठी आहे. तो संस्कृत "नाशवन्त" चा अपभ्रंश असू शकेल. तसे असल्यास "ज्याला नाश आहे असा" असा त्याचा अर्थ होऊ शकेल. परंतु जसा वर्धमान शब्द आहे तसा हा शब्द रचना आणि अर्थ या दोन्ही दृष्टिकोनांतून नाही.

संस्कृतात वत् चे वान् अवश्य होते. उदा. भगवत् - भगवान्, यशवत् - यशवान्, इ.