बीमोड हा शब्द फारसी-अरबी नाही, तो आहे अस्सल मराठी. पदरमोड. बोटेमोड, आकडेमोड यांप्रमाणेच! म्हणजे बी आणि मोड हे दोन शब्द मिळून हा शब्द झाला आहे. शेतात बी पेरले आणि काही कारणाने ते उगवले नाही, किंवा अशक्त रोपे उगवली तर त्या जमिनीची बी-मोडणी, जमिनीचा बीमोड करावा लागतो. त्यामुळे पृथ्वीवर उगवलेल्या झाडांची कत्तल करणे म्हणजेच पृथ्वीचा बीमोड करणे! हा शब्दप्रयोग वापरल्याने योग्य आशय व्यक्त झाला आहे. ज्याने ही शब्दयोजना सुचवली त्याच्या मराठीच्या ज्ञानाला दाद दिली पाहिजे.
या शब्दाला नायनाट, नाश, पारिपत्य हे अर्थ लक्षणेने नंतर चिकटलेले आहेत. मराठीच्या शब्दातल्या उपांत्यपूर्व अक्षरातला इकार-उकार ऱ्हस्व असतो या नियमानुसार बीमोडमधला बी ऱ्हस्व असायला हरकत नव्हती. परंतु बीमोड हा आईबाप, मीठभाकर, हळूहळू यांसारखा जोडशब्द असल्याने बी ऱ्हस्व करायची गरज नाही; नव्हे, तो दीर्घच ठेवावा असे मला वाटते. यावर, मतभेद असू शकतील.