या लेखाचे शीर्षक पाहिले, आणि आमच्या कार्यालयातल्या एका बाईंची आठवण झाली. त्यांच्यापुढे कोणताही प्रस्ताव मांडला की त्या म्हणायच्या, पण खरचं?  तुमच्या संसूचनेचा विचार करायला हरकत नाही पण खर्च कुठून करायचा? 

मराठीत एकेकाळी 'जेव्हा' हा शब्द 'व्हा'वर  अनुस्वार देऊन लिहिला जायचा.  पण लोक बोलताना 'जे'चा अनुनासिक उच्चार करायचे. साहजिकच 'जेंव्हा' असे लिखाण व्हायचे. जेव्हा नियम बदलले आणि 'व्हा'वरचा अनुस्वार उडाला, तेव्हा 'जे'वर तो द्यायचा की नाही हा संभ्रम तसाच राहिला. अनुस्वाराच्या गल्लतीमुळे प्रियंवदाचे प्रियवंदा(x), संपदाचे सपंदा(x), इंग्रजीचे इग्रंजी(x) होणे अनेकदा दिसते.

नको तेथे बोलीभाषा वापरायचा प्रयत्‍न केला की एकाराच्या ऐवजी अनुस्वार द्यायची सवय लागते. पुढे असे होते की लोकचे अनेकवचनी रूप लोकं, केसचे केसं, जिराचे जिरं, घोडाचे घोडं व्हायला काही वेळ लागत नाही. संवादलेखन करताना गरज असेल तिथेच वक्त्याच्या तोंडचे शब्द वाचकाला जसेच्या तसे समजावे, म्हणून त्या प्रसंगी बोलीभाषा वापरावी;  अन्यत्र असे केल्यास ते अशुद्धलेखन समजले जाते असा नियम आहे. बोलीभाषेचा एवढा पगडा मराठी सोडून अन्य कोणत्याही भाषेतील लिखाणावर दिसत नाही.  मराठीचे अज्ञान असलेल्या आपल्या जाहिरातदारांनी असल्या लिखाणाचा जिथेतिथे प्रसार करून मराठी भाषेला कुरूप बनविली आहे.