लहानपणी वाचलेल्या आणि तेव्हा आवडलेल्या पुस्तकांची आठवण हृदयात अगदी जतन झालेली असते.. माझ्याकडेही लहानपणी एक 'देनिसच्या गोष्टी' नावाचं पुस्तक होतं. एका रशियन पुस्तकाचं भाषांतर होतं ते. सुंदर पिवळ्या 'हार्डबॅक' बांधणीचं ते पुस्तक माझ्या मोठ्या बहिणीने फोर्ट (मुंबई) मधून आणलं होतं. त्यावेळी अशासारखी बरीच भाषांतरीत पुस्तकं तेथे मिळायची. सांगायचा मुद्दा असा की, मी त्या पुस्तकाने एवढा भारावून गेलो होतो की बास! असंख्यवेळा त्या पुस्तकाचं पारायण केलं होतं. परिणामी ते पुस्तक अक्षरशः विदीर्ण होत होत लयाला गेलं.
आजही कधी पुस्तकांच्या दुकानात गेलो तर त्या पुस्तकाची चौकशी करतो. पण ते पुस्तक नंतर कधीच मिळालं नाही. बऱ्याच लोकांना तर असं काही पुस्तक होतं हेच माहीत नसायचं.