जनाब अद्वैतुल्लाखानसाहेबांनी 'खरचं'वर इतके अल्फ़ाज़ खर्च केलेले दिसले. त्यांच्या मेहेरबान नज़रेतून 'समज़त' या  शब्दाकडे दुर्लक्ष झालेले दिसले. त्या शब्दासाठी थोडेसे लिहिण्याची तकल्लुफ़ करीत आहे, इज़ाज़त असावी.

मराठीतून अनुच्चारित अनुस्वार काढून टाकावे यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी साहित्य महामंडळाकडे  धोशा लावला होता.   उद्देश हा की, नव्या राज्यातील सरकारी नोकरांना फाइलींवर मराठीतून लिहिताना तसेच मराठी टंकलेखक-लेखिकांना फार कष्ट पडू नयेत. ज्याच्या नांवातच फक्त साहित्य आहे अशा महामंडळाने सरकारपुढे मान तुकवली आणि अनुस्वारांची टिंबशः विल्हेवाट लावली. त्यामुळे व्युत्पत्तीने सिद्ध होणारे-न होणारे, बोली भाषेत रूढ असलेले आणि अर्थभिन्नत्व दाखवण्यास आवश्यक वाटणारे अनेक अस्पष्ट अनुस्वार उडाले. मराठीतल्या एकारान्त नपुंसकलिंगी शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार न देण्याचा नियम झाला. टंकलेखन किंवा हाताने लिहिण्याची चांगली सोय झाली, पण बोलीभाषेत अंत्य अकाराचा अऽ असा उच्चार अनुस्वाराने दाखविणाऱ्यांची पंचाईत झाली. मात्रा गेल्या, पण अनुस्वार राहिले आणि दुप्पट जोमाने फोफावले.  परिणाम असा झाला की महामंडळाने वैचारिक लिखाणात निषिद्ध म्हणून शिक्कामोर्तब केलेल्या बोलीभाषेचा वापर सररास होऊ लागला. दिवसेंदिवस हा आजार इतका बळावला की, 'तसल्या' बोलीशी परिचित असलेल्या ईन मीन साडेतीन टक्के लोकांच्या वर्तुळाबाहेर काही असे मराठीजन आहेत की त्यांना हे लिखाण समजत नाही, याची पर्वा लिहिणाऱ्यांना राहिली नाही.

अनुस्वार अनवधानाने द्यायचा राहून गेला (आणि हे बरेचदा होणार !) की, 'समज़तं' सारख्या शब्दाचे  एक समज़ेपार  लिखाणात रूपान्तर होते. एका गाण्यातल्या खाली दिलेल्या ओळी वाचा, याचे प्रत्यंतर येईल.

व्याहान धाडल घोड, घोड कसबस चाल ।