आमच्या सुदैवाने आमचा धर्म हिंदू आहे.  ह्या धर्मात देव मानायला किंवा नास्तिक असायला हवीतशी मुभा दिलेली आहे. ज्या पुस्तकात संपूर्ण धर्म बांधून ठेवला आहे असा कुठला एकमात्र ग्रंथ हिंदुधर्माने प्रमाण मानलेला नाही. कुठल्याही हिंदू समजल्या जाणार्‍या देव-दैवत-रूढी-वाङ्‍मयावर टीका-टिप्पणी करायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पूजाअर्चा, आरत्या, भजने न केल्यास माणूस हिंदुधर्मातून बाहेर फेकला जात नाही.  तथाकथित धर्मबाह्य कृत्य केल्याने एखाद्याला  धर्मातून बाहेर काढण्याची,  किंवा त्याला मृत्यूनंतर स्मशानात जाळू दिले जाणार नाही, असल्या पोकळ धमक्या देण्याची सोयही धर्माने ठेवलेली नाही. अशा परिस्थितीत देव न मानणारे श्रीराम लागू अस्सल हिंदू असल्यास आश्चर्य नाही. त्यांना भारतीयच काय पण जगातल्या कुठल्याही संस्कृतीवर आणि कुठल्याही धर्मावर बोलायचा जन्मजात अधिकार आहे.