आपल्या आजूबाजूस हजारो माणसे असतात. सारेच काही आपले मित्र नसतात. पण शत्रूदेखील नसतात. प्रसंग परत्वे समान हिताहिताच्या निमित्ताने त्यांचा अधिक संबंध येतो आणि मग त्यातच एखादा मित्र भेटून जातो.

राम आणि सुग्रीव प्रथम भेटले तेव्हा ते नक्कीच एकमेकांचे मित्र नव्हते. पण रामाच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे(चेहऱ्यावरील हास्य, आश्वासक देहबोली) या मुळे सुग्रीव अधिक निकट आला. दोघांचे हितसंबंधात समानता आढळली म्हणून  ते अधिक जवळ आले.  मित्र म्हणून जवळ करण्यापुर्वी त्याने रामाची परीक्षा देखील घेतली. मग अग्नी-साक्षीने आणाभाका झाल्या. आणि मग जसजसे साहचर्य वाढले तसतसे त्यांच्या मैत्रीत घनिष्टता आली. वाली वधानंतर, सुग्रीव ऐष आरामात बुडून गेला तेव्हा त्या मैत्रीत थोडा ताण ही निर्माण झाला होता.

मैत्री म्हणजे नुसती तोंडोळख नव्हे. ती तर मैत्रीची नुसती सुरवात असते. पण त्यासाठी सुद्धा दोघांच्यातील स्मिताची देवाणघेवाण आवश्यक ठरते. त्या नंतर मात्र मैत्री घट्ट होण्यासाठी त्यागाची गरज असते. "प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी ! " अन, हा त्याग नेहमीच फार मोठा असावा लागतो, अशातला भाग नाही.

इतिहास-पुराणात, मित्रांच्या असंख्य जोड्या आढळतात. कृष्ण-सुदामा, कर्ण-दुर्योधन, कृष्ण-अर्जून, शिवाजी-तानाजी...... त्यांच्या नात्यातील जिव्हाळा आपल्यापर्यंत आलेल्या कथातून निश्चित जाणवतो. ते हसतमुख होते का? गोड बोलत होते का? त्यांच्या जवळ विनोदबुद्धी होती का? नम्र होते का नव्हते? ते सर्व केवळ अनुमानानेच जाणावे लागेल. अनुमान क्वचितच विरुद्ध जाईल!

परंतु नवे मित्र जोडण्यासाठी मी माझ्या कवितेत वर्णन केलेल्या गुणांची नितांत गरज असते, हे नक्की!

मनुष्य समाज प्रिय प्राणी आहे. कुणी तरी आपल्याला नावाजावे, समाज मान्यता मिळावी, ही त्याची भूक असते. जेवढे मित्रमंडळ मोठे तेवढी ही भूक भागण्याची शक्यता अधिक!

लोकशाहीत तर आपल्याभोवती माणसे गोळा करण्याची कला अवगत असावीच लागते. तोच खरा राजकारणी!

एक गोष्ट मात्र खरी- रामदासांचे बोल आठवा- ''राखावी बहुतांची अंतरे'' - ते सर्वांची अंतरे राखण्याची बात बोलत नाहीत! ते शक्य नाही; प्रयत्न सास्तीत जास्त लोकांची अंतरे राखण्याचा हवा!